आटपाडीमध्ये जनसंवाद पदयात्रेला प्रतिसाद
आटपाडी प्रतिनिधी
भाजपच्या माध्यमातुन केंद्र सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. तोच प्रकार राज्य सरकार करत आहे. देशातील अनेक राज्यांनी भाजपच्या सरकारला नाकारले आहे. त्याचेच अनुकरण महाराष्ट्रात झाले पाहिजे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीहल्ला करून सत्तेचा गैरवापर केला आहे. राज्यात व देशात महागाई, बेरोजगारीसह जाती-धर्मात वाढविला जाणारा तेढ हा गंभीर विषय असल्याची टिका माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केली.
आटपाडी तालुक्यात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा उत्साहात पार पडली. नेलकरंजी ते खरसुंडी दरम्यान पदयात्रेनंतर खरसुंडी येथे आयोजित सभेत डॉ.विश्वजित कदम बोलते. विशाल पाटील, डॉ.जितेश कदम, अशोकराव गायकवाड, युवक काँग्रेसचे जयदीप भोसले, उपसभापती राहुल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम म्हणाले, व्देषाचे राजकारण करून हुकूमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या सरकारला सत्तेवरून खेचण्याची गरज असुन जनतेने हा लढा हातात घ्यावा. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओरिसा, बिहार, प.बंगाल, झारखंड, राजस्थान, पंजाब, दिल्ली आदि राज्यातील साडेतेवीस कोटी लोकसंख्येने भाजपाला नाकारले आहे. आपणही या सरकारला नाकारण्याचा निर्धार करावा. 2014 पासून नऊ राज्यातील विरोधी सरकारे या भाजपा नेत्यांनी वाईट उद्योगातुन पाडली आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे तुकडे करणाऱ्या भाजपने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवर लाठीचार्ज करून त्यांची लोकांबद्दलची वाईट भावना कृतीत उतरविली आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. महागाई, बेरोजगारी याबरोबरच जाती-धर्मातील वाढती तेढ ही बाब गंभीर असुन जनतेने भाजपच्या कारस्थांनाना बळी पडु नये, असे आवाहनही माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केले.
काँग्रेसचे नेते विशाल पाटील म्हणाले, साडेनऊ वर्षात एकाही पत्रकार परिषदेस उपस्थित न राहणारे या देशातील मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्न ऐकून घेत नाही. फक्त बोलण्याचे काम सुरू आहे. देशाच्या पंतप्रधानांना अंबानी व अदानी शिवाय काहीच ऐकु येत नाही. जनतेचे प्रश्न ऐकण्याचे काम देशात फक्त राहुल गांधी करत असुन भाजपच्या वाईट विचारांना जनतेने जागा दाखवावी.
विश्वजित कदम यांच्या नेतृत्त्वाखाली सांगली जिल्ह्यात खासदार व आमदार निवडुन येणार आहेत. काँग्रेस पक्ष विचाराने एकसंघ आहे. जनतेने काँग्रेसच्या विचाराने राज्यात आणि देशात सत्तांतर घडवावे. जनतेचे ऐकुन घेण्याची धमक पंतप्रधानांमध्ये नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. क्रिकेट असो किंवा चंद्रयान असो टीव्हीमध्ये फक्त मोदीच दिसतात. परंतु सामान्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी ते कधीच पुढे आले नाहीत, अशी टिकाही विशाल पाटील म्हणाले.
मनमंदिर उद्योग उद्योग समूहाचे संस्थापक अशोकभाऊ गायकवाड यांनी डॉ.विश्वजित कदम यांच्याकडुन जनतेला खूप अपेक्षा असल्याचे सांगत काँग्रेसने उभारी घेण्याची गरज व्यक्त केली. डॉ.जितेश कदम यांनी भाजपने जनतेला प्रलोभने दाखवुन फसवणुक केल्याची टिका केली. लोकांचा भ्रमनिरास करत भाजपने तीनपट महागाई वाढवली. सर्वसामान्य जनतेस काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे चित्र आज दिसत असल्याचेही ते म्हणाले.
युवक काँग्रेसचे जयदीप भोसले यांनी सरकारच्या चुकीच्या भुमिकेमुळे जनता अडच्चणीत असुन त्यातुन लोकांना दिलासा देण्याचे काम काँग्रेसचे करेल, असा विश्वास व्यक्त केला. अरूण वाघमारे, बाजार समिती उपसभापती राहुल गायकवाड, अॅड.विलास देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. शिवसेना युवा नेते बंडू कातुरे यांनी डॉ.कदम व विशाल पाटील यांचा सत्कार केला.
पदयात्रेत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील, हणमंतराव गायकवाड, बाबासो भोसले, पळशीचे संभाजी जाधव, गणपत काटकर, बाबासो पुजारी, विलास शिंदे, कवठेमंहकाळचे बाळासो गुरव, विजय पुजारी, सारिका भिसे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. पदयात्रेला लोकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. विविध संघटना, पक्षांनी जनसंवाद पदयात्रेला पाठींबा दर्शविला.
खासदारांवर टिकास्त्र
पदयात्रेनंतर सभेमध्ये विशाल पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले. तीर्थक्षेत्रासाठी गेल्या दहा वर्षात खासदार फंडातून फक्त एकच काम झाले असून काम न करता प्रसिध्दी करायची खासदारांची पध्दत आहे. गत साडेचार वर्षात न फिरणारे खासदार आज फिरताहेत. खांद्यावर हात टाकणारा हा खासदार खिशातील पाकीट कधी काढून घेईल हे कळणार नाही, अशा शब्दात खासदारांवर विशाल पाटील यांनी टिका केली. तर पदयात्रेच्यानिमित्ताने कै.पतंगराव कदम, कै.मोहनराव भोसले यांच्या आठवणीना यावेळी उजाळा देण्यात आला.








