सुरू न झाल्याने चौदा शिवभोजन केंद्रांची मंजुरी रद्द; सध्या 44 केंद्रावरून दररोज साडेपाच हजार थाळींचे वाटप
सांगली प्रतिनिधी
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वकांक्षी योजना असलेली शिवभोजन थाळी आता लोकप्रिय झाली आहे. सध्या जिल्ह्यात 44 शिवभोजन केंद्रावरून दररोज सुमारे साडेपाच हजार थाळींचे वाटप करण्यात येत असून नव्याने 28 शिवभोजन केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. परंतु दोन राज्य शासनाने मंजूर करूनही सुरू न झालेल्या 14 शिवभोजन केंदांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.
गरीब गरजू जनतेला अल्पदरात भोजन मिळावे या हेतूने राज्य शासनाने 26 जानेवारी 2020 पासून शिवभोजन केंद्रांची सुरूवात केली. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होते. सुरूवातीला जिल्हयात अडतीस शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली होती. शिवभोजन केंद्र चालकांना शहरी भागात 40 तर ग्रामीण भागात 25 रूपये अनुदान देण्यात येते. लाभार्थी व्यक्तीकडून दहा रूपये घेण्यात येतात. सुरवातीपासून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे स्टेशन, बसस्थानके, सरकारी दवाखाने, शासकीय कार्यालये तसेच वर्दळीच्या ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले. गोरगरीब गरजूंबरोबर ग्रामीणभागात शालेय विद्यार्थ्याचीही भूक शिवभोजन केंद्रामुळे भागली.
कोरोना काळात दहा लाखांवर नागरिकांची भुक भागवली
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2020 पासून 13 एप्रिल, 2021 पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना 5 रु. प्रतिथाळीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली. या काळात जिल्हयात 10 लाख 46 हजार 392 गरजूंनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 15 एप्रिल 2021 पासून 30 सप्टेंबर 2021 पर्यंत दीडपट इष्टांक तसेच मोफतप्रमाणे शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. या काळात 9 लाख 48 हजार 268 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ झाला.
44 केंद्रातून साडेपाच हजार थाळींचे दररोज वितरण
सध्या जिल्हयात 44 शिवभोजन केंद्रे सुरू असून या केंद्रातून 5425 शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात येते. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या टप्प्यात नव्याने 28 शिवभोजन केंद्रांना मंजुरी दिली आहे. ही शिवभोजन केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. केंद्र चालकांनी सुचवलेल्या जागांची पहाणी करणे, नागरिकांचा प्रतिसाद आणि नियमानुसार जागा असल्याची खात्री करून ही केंद्रे सूरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा विभागामार्फत त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी दिली.
दरम्यान शासनाने मंजुरी देऊनही जूनपर्यंत सुरू न झालेली सर्व शिवभोजन केंद्रे बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हयातील 14 केंद्रे बंद झाली असल्याचे सांगण्यात आले.