सांगली :
सांगली, कोल्हापूरमध्ये सलग 20 वर्षे अतीवृष्टी होतच आहे. त्यामुळे महापुराचे पाणी वळवण्यासाठीची योजना तत्काळ अंमलात आणण्यासाठी येत्या 15 दिवसात टेंडर काढू. सांगली आणि कोल्हापूरची महापुराच्या संकटातून कायमस्वरूपी मुक्तता केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सुमारे 150 टीएमसी पाणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तलाव भरणे, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पुरवणे आणि उजनी धरणामार्गे मराठवाड्यातील दुष्काळी भागाला देण्याची ही 3200 कोटीची योजना आहे. ज्याला जागतिक बँकेने कर्ज मंजूर केले आहे. हे पाणी महाराष्ट्र, कर्नाटक कोणाच्याही वाट्याचे नसून पावसाळ्यात वाहून समुद्राला मिळणारे आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर कितीही अतिवृष्टी झाली तरी सांगली, कोल्हापूरला महापुराचा धोका उद्भवणार नाही अशी ही योजना असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.
- ई गव्हर्नन्स, उत्तरदायी प्रशासन
राज्यातील सरकारने सहा महिने पूर्ण केले असून पहिल्या शंभर दिवसात आपण प्रशासन गतीमान केले आहे. त्यांच्यात स्वच्छतेपासून प्रलंबित कामे आणि कागदपत्रांची जपणूक यांची स्पर्धा लावली. भाजपची सत्ता आहे. आता आपल्याला गतीशील आणि पारदर्शीच काम करावे लागेल, हे राज्यातील 12 हजार सरकारी कार्यालयांच्या लक्षात आले आहे. त्यानुसार 150 दिवसांचा कार्यक्रम त्यांना दिला आहे. या दीडशे दिवसात प्रशासकीय सुधारणा, व्हॉटसअॅपवर अर्ज, फी आणि कामाची पूर्तता करून लोकांना शासकीय कार्यालयात जावे लागू नये असे इ गव्हर्नन्स यशस्वी करू. पुढे फाईल कोणत्या टेबलवर अडते, याचा अभ्यास करून संबंधित यंत्रणेला जबाबदार ठरवले जाईल, असे फडणवीस म्हणाले.
आपण गेल्या सरकारमध्ये काम केले. मात्र उध्दव ठाकरे यांच्या काळात त्यांनी सर्व ठप्प केले. यापुढे सत्तेत कोणीही आले तरी आपली कार्यपद्धती बदलू शकणार नाहीत, असे सरकारी इन्स्टिट्यूशन आपल्याला बनवायचे आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्या विकसित भारत योजनेत ‘विकसित महाराष्ट्र 2047’ साठीही दोन टप्पे केले आहेत. 2029 पर्यंत प्रत्येक वर्षाचे विकासाचे लक्ष्य ठरवले आहे त्यानुसार प्रत्येक क्षेत्रातील विकासाचे मूल्यमापन होईल. 2035 साली महाराष्ट्र स्थापनेच्या अमृत महोत्सवा महाराष्ट्र कुठे असावा याचाही आराखडा आखला जात आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्था जिंका
निधी कमी पडू देणार नाही
मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेला अभूतपूर्व यश मिळविल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. आता आपली दुसरी परीक्षा आहे. निवडणूक आयोगाने पहिली नोटीफिकेशन जारी केली आहे. त्यानुसार चार महिन्यांच्या आत जिल्हा परिषद आणि नगरपालिकांची निवडणूक पहिली किंवा पाच सहा दिवसांच्या अंतराने होईल. नंतर महिनाभरात महापालिका निवडणुका होतील, असे सुतोवाच केले. या निवडणुका सांगलीच्या कार्यकर्त्यांनी जिंकाव्यात. राज्यात आणि गावातही एकाच विचाराचे सरकार असेल योग्य विकास होतो. तुम्ही सत्ता आणा मी निधीत कमी पडणार नाही, तसे ते म्हणाले.
- 72 तासांचा आनंद आणि संकोच…
महापुराचे पाणी वळविण्याच्या योजनेबाबत सांगताना आपणास आनंद आणि संकोचही होतो, असे सांगून फडणवीस म्हणाले, 2019 मध्ये 72 तासाचा मुख्यमंत्री बनल्यानंतर मी पहिल्यांदा जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर करार केला. आधीच्या सरकारमध्ये या योजनेला मूर्त रूप दिले होते. पण, औटघटकेला करार करावा लागला. पुढे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये ते काम ठप्प झाले होते आता या सरकारमध्ये 15 दिवसात टेंडर प्रक्रिया सुरू होईल, भविष्यात दोन्ही जिल्हे या समस्येतून मुक्त होतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.








