विटा प्रतिनिधी
विटा येथे खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस तालुक्यातील लोकांना सोईस्कर होईल अशा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास मंजूरी मिळाली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित असणारे जिल्हा सत्र न्यायालय मंजूर व्हावे, यासाठी पाठपुरावा करत होतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने हा प्रश्न निकाली लागला आहे, अशी माहिती आमदार अनिल बाबर यांनी दिली.
याबाबत आमदार बाबर यांनी दिलेली माहिती अशी, खानापूर, आटपाडी, कडेगाव, पलूस या तालुक्यातील लोकांना सांगलीला जाण्यास जवळपास ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. लोकांची अन्य बाबतीतही होणारी गैरसोय टाळण्यासाठी विटा हे या चारही तालुक्यातील लोकांना मध्यवर्ती ठिकाण आहे. अंतर ही कमी आहे. न्यायालयाची इमारत भव्य आणि प्रशस्त असल्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय व्हावे, ही मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याची दखल घेत त्या अनुषंगाने या कामी लागणारी पदनिर्मिती करण्याबाबत (विधी व न्याय) राज्य शासनाने मंजुरी दिली असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.








