पती, पत्नी आरोपी : प्रजासत्ताक दिनी दंगल घडवण्याचा उद्देश?
सांगली- प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री पुष्पराज चौक येथील असणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळयाला रेड ऑक्साईड व अल्युमिनियम कलर टाकुन विटंबना केल्या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे. 50 सीसीटीव्ही कॅमेरा वरील रेकॉर्ड तपासून या जोडप्याला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी जाती दंगल भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा असा संशय आहे.
त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाणे येथे भादवि कलम २९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेमुळे समाजामध्ये अशांतता निर्माण झाली झाल्याने गुन्हा उघडीकस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली , अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी कल्लाप्पा पुजारी व गुन्हे प्रकटीकरण कक्षास तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश केले होते. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील एक पथक व विश्रामबाग पोलीस ठाणे कडील एक पथक असे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते.
50 सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने सापडले आरोपी
घटना घडल्यापासून पोलिसांनी याप्रकरणी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले होते. विश्रामबाग पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सायबर विभाग झटून कामाला लागल्याने पुतळ्याची विटंबना करणारे पती-पत्नी त्यांच्या हाती लागले. मात्र विटंबना करणारे लोक तेच आहेत आणि ते कुठून पुतळ्यापर्यंत कसे पोहोचले या सर्वांची संगतवार माहिती जमा करणे आव्हानात्मक होते. गुन्हा हा खुप गंभीर असल्याने आणि समजामध्ये तेढ निर्माण होणार असल्याने अनुषंगाने घटनास्थळावरून प्राप्त पुरावा व तांत्रिक तपासाचे अनुषंगाने सलग ७२ तास तपास करून या दांम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या दांम्पत्याला न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणेकडील फौजदार निवास कांबळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हि विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सपोनि अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, आदिनाथ माने, विलास मुंढे, दरीबा बंडगर, संदिप घस्ते, महमद मुलाणी, भावना यादव, हवालदार संजय मोटे, सद्दाम मुजावर, शिपाई श्रावण जाधव, नाईक रणजित घार्गे, सर्जेराव पवार, किरण कांबळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील हवालदार सागर लवटे, अनिल कोळेकर, संतोष गळवे, विक्रम खोत तसेच सायबर पोलीस ठाणे कडील हवालदार प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली आहे.