सांगली प्रतिनिधी
येथील सफाई कामगार सहकारी संस्थेने व्यवसायासाठी घेतलेल्या 76 लाख रूपये रकमेचा अपहार केल्याबद्दल अध्यक्ष जीवन सदाशिव कोलप (रा. इनामधामणी), सचिव अरविंद पांडुरंग पाटील, कंत्राटदार सतीश बापूसो देसाई (रा. माळी कॉलनी, कोल्हापूर) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. लेखापरीक्षक श्रेणी-1 दिलीप यशवंत एडके यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित जीवन कोलप, सचिव अरविंद पाटील आणि इतर संचालक यांनी सांगलीत तरूण भारत स्टेडियमजवळील कामगार चाळ येथे सफाई कामगार सहकार संस्थेची स्थापना बारा वर्षापूर्वी केली होती. संस्थेच्या माध्यमातून बेरोजगारांना उद्योग देण्याचा प्रस्ताव बनवला होता. शिराळा तालुक्यातील वाडीभागाई येथे नटबोल्ट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव पाठवला होता. संस्थेने पहिल्या टप्प्यातील अटी-शर्तीची पूर्तता केल्यानंतर इमारत उभी करण्यासाठी 76 लाख रूपयाचे अनुदान शासनाने दिले होते. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर शासकीय परिपत्रकातील अटी-शर्तीचे पालन अध्यक्ष, सचिव व कंत्राटदाराने केले नाही. संचालक मंडळ कार्यरत असताना त्यांनी बँक खात्यातून व्यवहार केले. इमारतीसाठी प्राप्त झालेली रक्कम अध्यक्ष कोलप, सचिव पाटील, कंत्राटदार देसाई यांनी 2011 ते 2015 या काळात परस्पर हडप केली.








