राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील लोखंडी सळईवर डल्ला
प्रतिनिधी / मिरज
मिरज-पंढरपूर मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील शिल्लक राहिलेल्या भंगारातील सुमारे साडेआठ लाख रुपयांच्या लोखंडी सळईने भरलेला ट्रक चोरुन नेण्यात आला. याप्रकरणी डीबीएल कंपनीचे स्टोअर मॅनेजर सुजितकुमार पांडे (वय 43, रा. रमा उद्यान, मिरज) यांनी बबलू मिना (वय 28, मुळगांव राजस्थान, सध्या रा. सिध्देवाडी खण) याच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात लोखंडी सळईचा वापर करण्यात आला आहे. यापैकी काही सळई वापरातून काढून टाकण्यात आल्याने त्या भंगारात दाखल झाल्या आहेत. अशा सळ्यांचा भरलेला ट्रक मार्गालगत पार्क करुन ठेवण्यात आला होता. तो 19 एप्रिल रोजी चोरुन नेण्यात आला. याची माहिती डीबीएल कंपनीचे स्टोअर मॅनेजर सुजितकुमार पांडे यांना कळताच त्यांनी ग्रामीण पोलिसात धांव घेऊन चोरीची फिर्याद दाखल केली. याच कंपनीत काम करणारा बबलू मिना याने सदरची चोरी केली असल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. चोरीस गेलेल्या भंगारात विविध आकाराच्या सळईंचा समावेश होता. ट्रकसहीत त्याची किंमत आठ लाख, 53 हजार रुपये इतकी आहे.