ऊटीत होणार आयोजन : सरसंघचालकांसह वरिष्ठ पदाधिकारी होणार सामील
वृत्तसंस्था/ ऊटी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक तामिळनाडूत पार पडणार आहे. 13-15 जुलैदरम्यान ऊटी येथे ही बैठक होणार असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. दरवर्षी होणाऱ्या या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ पदाधिकारी सामील होणार आहेत. या बैठकीत संघाच्या वाटचालीसंबंधी चर्चा होते तसेच विविध मोहिमांची माहिती जाणून घेतली जाते. आगामी काही महिन्यांमधील कामकाजाचा आराखडा या बैठकीत निश्चित केला जाऊ शकतो.
ही वार्षिक बैठक प्रामुख्याने संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित होते. या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, सी.आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त हे प्रामुख्याने सहभागी होतील. बैठकीत सर्व प्रांत प्रचारक आणि सह-प्रांत प्रचारक यांच्यासमवेत क्षेत्र प्रचारक आणि सह-क्षेत्र प्रचारक तसेच सर्व कार्य विभागांचे अखिल भारतीय पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली आहे.
बैठकीत संघाशी निगडित सर्व संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्रीही सामील होतील. बैठकीत मुख्यत्वे यंदा झालेल्या संघ शिक्षावर्गांची समीक्षा, संघ शताब्दी कार्यविस्तार योजना, शाखा स्तरीय सामाजिक कार्यांचा तपशील आणि अनुभवांचे आदान-प्रदान इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. आगामी काळात कोणत्या मुद्द्यांवर भर देण्यात यावा आणि संघाचा अजेंडा यासंबंधीही बैठकीत चर्चा होऊ शकते.









