मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट
प्रतिनिधी /मडगाव
आयआयटी शैक्षणिक प्रकल्प सांगे मतदारसंघातच होणार असून याबद्दल सरकार गंभीर आहे. आयआयटी आणि सरकार यांच्यात करार होण्यासाठी थोडा उशीर झाला. मात्र, आम्ही त्याविषयी आयआयटीला कळवले आहे. सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून हे काम होताच ती जागा आयआयटीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कावरे येथे समाजकल्याणमंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आयआयटीसंदर्भात आपण अद्याप भाष्य केले नव्हते, तरी हा प्रकल्प सांगेतच येणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वर्षे वेगवेगळय़ा ठिकाणी आयआयटीसाठी प्रयत्न केले. यावेळी सांगेत जागा निश्चित केली आहे. ज्या तऱहेने मंत्री सुभाष फळदेसाई प्रयत्नांची पराका÷ा करत आहेत, त्यानुसार आयआयटी सांगेतच होणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक पथक करणार पाहणी
आयआयटीच्या तांत्रिक पथकाने येथे येऊन पाहणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच जाहीर करणे योग्य होणार आहे. जी जागा निश्चित केली आहे, ती सरकारच्याच मालकीची असून आम्हाला आयआयटीसाठी दुसऱयांकडून जागा घेण्याची आवश्यकता नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सांगेलाच होईल लाभ
कोणी कितीही टीका केली तरी सुभाष फळदेसाई यांना आयआयटीचा तसा वैयक्तिक कोणताही फायदा होणार नाही. पण आयआटीचा फायदा सांगे मतदारसंघाला होणार आहे. येथील लघु उद्योगांच्या भरभराटीसाठी आयआयटी फायदेशीर ठरेलच. शिवाय पाच हजार कर्मचाऱयांच्या राहण्याची सुविधा येथील लोकांना उपलब्ध करून द्यावी लागेल. आहे. लॉजिंग-बोर्डिंग, टॅक्सी आणि रेस्टॉरंट व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्याशिवाय क्लास सी आणि डी स्तरावरील नोकऱया स्थानिकांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही घटकांकडून आयआयटीला पद्धतशीरपणे विरोध करण्याचे सत्र कायम आहे. मात्र, स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई हे कोणत्याही दडपणाखाली येणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे. सरकारच्या मालकीच्या जागेतच आयआयटी प्रकल्प साकारला जाईल हे त्यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांनी सरकारच्या जागेवर कब्जा केला आहे. त्यांच्याकडून ती परत मिळविली जाईल. हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.









