मालवण येथील ग्लोबल रक्तदाते आणि एकता मित्रमंडळाचा पुरस्कार
ओटवणे |प्रतिनिधी
जागतिक स्वैच्छिक रक्तदाता दिनानिमित्त मालवण येथील ग्लोबल रक्तदाते आणि एकता मित्रमंडळ यांच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श रक्तदाता संस्था पुरस्कार सांगेली येथील युवा विकास प्रतिष्ठान या संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवा विकास प्रतिष्ठानच्या रक्तदान चळवळीतील कार्याचा गौरव केला. सावंतवाडी तालुक्यातील सांगली येथील युवा विकास प्रतिष्ठान या संस्थेमार्फत या गावातील हायस्कूलच्या दहावी वर्गातील १२ वर्ग मित्रांनी एकत्र येऊन रक्तदान क्षेत्रात काम सुरू केले. या संस्थेमार्फत गेली १० वर्षे नव वर्षाच्या स्वागताला म्हणजेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते. तसेच दर वर्षी ४० ते ५० नवीन रक्तदाते या संस्थेशी जोडले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे ४५० रक्तदाते या संस्थेशी जोडले गेले आहेत. या संस्थेच्यावतीने तातडीच्या वेळी गोवा येथील बांबोळी, म्हापसा उत्तर जिल्हा रुग्णालय, मणिपाल हॉस्पीटल तसेच ओरोस जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी रग्णालयांसाठी रक्तदाते पाठविले जातात.संस्थेच्या रक्तदान चळवळीतील या कार्याची दखल घेत आदर्श रक्तदाता संस्था पुरस्कार युवा विकास प्रतिष्ठानला प्रदान करण्यात आला. यावेळी मालवण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी पाटील, ग्लोबल रक्तदाते संस्थेचे विजय पांचाळ, अमेय देसाई, सांगेली युवा विकास प्रतिष्ठानचे गिरीधर राऊळ, लक्ष्मण रेमुळकर, सचिन राऊळ, पंढरी सावंत आणि महेश रेमुळकर उपस्थित होते.









