या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली असूनअधिक चौकशी सुरू आहे.
संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथील एका वृद्ध महिलेचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी अटक केली असून दोघा आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. बानू फकीर महमद जुवळे (70) असे या वृद्ध महिलेचे नाव आहे.
कडवई मोहल्ल्यातून 2 मे 2025 रोजी बेपत्ता झालेल्या बानू फकिर मोहम्मद जुवळे यांचा मृतदेह अखेर जंगलात आढळून आला. संगमेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर खून प्रकरणातील एक संशयित आरोपी रिझवान जुवळे याला अटक करण्यात आली आहे.
बानू फकीर महमद जुवळे या महिलेला एक महिला घराबाहेर घेऊन गेली होती. त्यांनतर कडवई येथील अट्टल गुन्हेगार रिझवान जुवळे आणि त्याच्या दोघा साथीदारांनी या महिलेचा खून करून तिचा मृतदेह कुंभारखाणी येथील जंगलात फेकून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बानू फकीर महमद जुवळे हिचा खून दागिने चोरण्याच्या उद्देशाने झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
बानू जुवळे या अचानक बेपत्ता झाल्यानंतर 9 मे रोजी त्यांचे नातेवाईक मुनिरा बशिर अहमद जुवळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला असता काही दिवसानंतर त्यांचा मृतदेह जंगलात सापडला. तपासाच्या धागेदोऱ्यांवरून पोलिसांनी ही घटना अपघात नसून सुनियोजित खून असल्याचे निष्पन्न केले.
प्राथमिक माहितीनुसार दागिन्यांसाठी हा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी केलेल्या तपासाचे कौतुक होत आहे. या कामी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस अंमलदार सचिन कामेरकर, चंद्रकांत कांबळे, सोमा आव्हाड, बाबू खोंदल आदींच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या 12 तासात एका संशयिताला अटक केली.








