निसर्ग कोकण मेवा फॅक्टरीला लागलेल्या आगीत 60 लाख रुपयांचे नुकसान
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे चंद्रकांत गणू बांबाडे यांच्या काजू प्रक्रिया उद्योग असलेल्या इमारतीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजू फॅक्टरीचे सुमारे 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना शनिवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
चंद्रकांत बांबाडे यांची निसर्ग कोकण मेवा काजू फॅक्टरी आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे फॅक्टरीत जात असताना आग लागल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या आगीत बांबाडे यांच्या काजू प्रक्रिया उद्योग असलेल्या इमारतीतील काजू सोलण्याच्या किंमती मशिनरी तसेच 3 हजार काजूगर, 10 टन काजू बिया आणि अन्य सामानाचे नुकसान झाले.
देवऊख नगर पंचायतचा अग्निशमन बंब दाखल होण्यापूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.
काजू फॅक्टरीला आग लागल्याचे समजताच आमदार शेखर निकम तसेच जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि तत्काळ मदत केली.
पोलीस पाटील अप्पा पाध्ये, पोलीस संदेश जाधव, लोखंडे, ग्राम महसूल अधिकारी विलास घोलप, संदेश घाग आदी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. मात्र आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.








