मणेराजूरी/प्रतिनिधी
मणेराजूरीच्या मुख्य साठवण तलावामध्ये सांगलीचा युवक बुडाला आहे. राहूल भरत बुरुड (वय ३०) असे त्याचे नाव असून मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. रात्रीपासयं मृतदेह शोधण्यात येत होता. अखेर बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले.
घटनास्थळ व तासगाव पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सांगली पंचशीलनगर, शिंदे मळा परिसरातील नऊ युवक दोन चारचाकी गाड्यांमधून देवदर्शनासाठी मंगळवारी सकाळी आरेवाडी येथे गेले होते. देवदर्शन व जेवणाचा बेत करुन परतत असताना त्यांनी मणेराजूरी कोडयाच्या माळावर असणाऱ्या मुख्य साठवण तलाव पहाणेसाठी थांबले असता यातील राहूल बुरुड हा अंघोळीसाठी तलावात उतरला परंतु खोल असणाऱ्या डोहामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांन यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील दिपक तेली यांनी धाव घेवून तासगाव पोलीसांना याची माहिती दिली. खोल पाण्यामुळे मृतदेह शोधण्यासाठी सांगलीची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनीही रात्री साडेनऊपर्यत बुडालेल्या युवकाचा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधार व खोल पाणी यामुळे शोध मोहीम थांबवावी लागली.
दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता बुडालेल्या ठिकाणापासून वीस फूटावर मृतदेह आढळून आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह बुधवारी दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आला. मयत राहूल हा ट्रान्सपोर्टच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो विवाहित असून दोन मुले, पत्नी, भाऊ, आई असा परिवार आहे. या घटनेची तासगाव पोलीसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस नाईक विजय गस्ते व रामचंद्र नागणे करीत आहेत.
मुख्य साठवण तलावाची सुरक्षा करणे काळाची गरज
या तलावातून मणेराजूरीसह वस्ती भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या अगोदर ही दीड वर्षापूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह तलावात आढळला होता. मुख्य हायवे जवळ असलेमुळे अनेकजण तलावात कपडे धुणे, जनावर सोडणे, गाडया धुणे असे प्रकार सर्रास सुरू असतात. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी मणेराजूरी ग्रामपंचायतीने या तलावासाठी कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक अथवा कंपाऊड करुन घेणे काळाची गरज आहे.