वाहतूकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा
कासेगाव/प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील नेर्ले येथिल आशियाई महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने वाळू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याबाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, नेर्ले येथील आशियाई महामार्गावर बस थांब्यानजीक कोल्हापूरच्या दिशेने वाळू घेऊन जाणारा ट्रक MH-01L-4354 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ड्रायव्हरला वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे दुभाजकावर आदळून ट्रक पलटी झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र एक तासापेक्षा जास्त कालावधीसाठी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी ट्रक चालकाने ट्रक मधून उडी मारली असून तो जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सुदैवाने महामार्गावर ट्रक पलटी होत असताना वाहतूक कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघातग्रस्त वाहनामुळे कराड-कोल्हापूर लेनवर सुमारे एक तास वाहतूक बंद होती. महामार्गावर वाळूचा ढिग पसरून त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कासेगाव पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु करून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पसरलेली वाळू व अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. मात्र रात्री उशिरापर्यंत याघटनेची नोंद कासेगाव पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.