भिलवडी/प्रतिनिधी
भिलवडी येथील राज वस्त्रम हे कापड दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची फिर्याद महेश सदाशिव शेटे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
भिलवडी येथील प्रमुख बाजारपेठेमध्ये मुख्य रस्त्यालगत असलेल्या भिलवडी पोलीस ठाणेच्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या महेश शेटे यांच्या मालकीच्या राज वस्त्रम या कापड दुकानांमध्ये रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पाच लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. नेहमीप्रमाणे महेश शेटे हे रात्रीच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले.
रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्यामुळे भिलवडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राज वस्त्रम या कापड दुकानाच्या शटरच्या लॉक पट्ट्या ग्राइंडरच्या सहाय्याने कापून, दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे, आपण दिसणार नाही अशा पद्धतीने उलटे केले. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज हार्ड डिस्क काढून घेतली. त्यानंतर दुकानात नव्याने भरलेल्या सियाराम कंपनीचे कापड तागे व महागड्या साड्या मोठ्या पोत्यामध्ये भरून लंपास केल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यावर ही हात साफ करून सुमारे साठ हजारांची रोकड पळवून नेली. बॉक्स मधील साड्या काढून ते बॉक्स त्या ठिकाणी मोकळे ठेवल्याचे ही दिसून आले. सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर शटरच्या लॉक पट्ट्या कापल्या असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेटे यांनी तात्काळ भिलवडी पोलिसांशी संपर्क साधून,याबाबत माहिती दिली.








