ऑनलाईन टीम/ सांगली
मान्सूनपूर्व पावसाने काल दुपार पासून सांगली शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेले १२ तास पावसाची रिपरिप सुरु आहे. शिराळा, खानापूर, जात, मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यांनामधील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर आज सकाळी जत तालुक्यात वलसंग ते सोर्डी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
बिळूरला तलावात अडकला डंपर, पावसाचा दणका…
जत तालुक्यातील बिळूर येथील शिंधीहाळ तलावात शेतीसाठी माती आनण्यास गेलेला डंपर अचानक आलेल्या पावसामुळे अडकून पडला आहे. डंपर पाण्यात बुडला असल्याने मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळ पासून पावसाचा जोर कायम आहे. जत तालुक्यातील सर्वच भागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी सतत बरसत आहेत. दरम्यान, बिलुर येथील तलावात मातीचा डंपर अडकून पडला आहे.पाऊस व पाणी वाढत असल्याने हा डंपर काढताना अडचणी येत आहेत.
मिरज तालुक्यातील नरवाड गावाजवळ नव्यानेच काढलेल्या रेल्वे ओव्हर ब्रीज खाली पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठल्याने नरवाड गावचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे म्हैसाळ,मिरज ला जाणार्या प्रवाशी ग्रामस्थांची अडचण झाली आहे. पुलाखाली ल पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने वाहनांची वाहतूक खोळंबली आहे.
या ठिकाणी पूर्वीपासून रेल्वे गेट होते. मात्र मिरज-बेंगळूर रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले ने पूर्वी चे गेट बंद करून रेल्वे लाईन खालून पूल बांधण्यात आले.यासाठी मोठ्या प्रमाणात बोगदा खणण्यात आला आहे.सध्या उन्हाळ्यात याची अडचण भासली नाही मात्र गुरूवार पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या पुलाखाली पाणी साठले आहे.परिणामी वाहतूक खोळंबली आहे.पाण्याचा निचरा होण्यासाठी काढलेली खड्डे समप्रमाणात नसल्याने पाणी निघून जात नाही.परिणामी जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत प्रवाशांना ये जा करणे अवघड आहे. याबाबत ग्रामपंचायतीने तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही.
दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने काल दुपार पासून दुष्काळी जत तालुक्याला झोडपून काढले. गेल्या अनेक वर्षातील हा मान्सूनपूर्व पाऊस सर्वात मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी सतत बरसत आहेत.
शिराळा तालुक्यात पाऊस अद्याप सुरुच
शुक्रवारी सकाळी वलसंग ते सोर्डी रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला. तसेच उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी, जत शहर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाने मोठा दिलासा दिला असला तरी काही पिकांचे नुकसान ही झाले आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात काल सायंकाळ पासून आतापर्यंत पावसाने रिप रिप सुरूच ठेवली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. सध्या पेरणी पूर्व मशागतींना वेग आला होता तर काही शेतकऱ्यांनी धूळ वाफेवरची भात पेरणी पूर्ण केली आहे. अशातच मान्सून पूर्व पावसाने सुरुवात केल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. पश्चिम भागातील पावलेवाडी ते चांदोली धरण परिसरात काल सायंकाळ पासून पाऊस सुरूच असून वीज वितरण व्यवस्था कोलमडली आहे.
जत तालुक्यात सर्वाधिक माडग्याळ 83 तर जतला 78 मिमी पाऊस
काल दुपारी चार वाजल्यापासून मान्सून पूर्व पावसाने दुष्काळी जत तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे . तालुक्याच्या सर्वच भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. कालपासून ते आज सकाळ पर्यंत जत तालुक्यात सर्वाधिक मार्ग माडग्याळ मंडलमध्ये 83 मिलिमीटर तर जत मध्ये 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाने नागरिकांचे जनजीवनही विस्कळीत झाली आहे. नागरिकांना या पावसाने सक्तीच्या सुट्टीवर घरी बसवले आहे. गेल्या वीस वर्षात प्रथमच खरीप हंगमासाठी वेळेत पाऊस झाला आहे, हे दिलासादायक आहे.
दरम्यान, दोन दिवसापासून सुरू असणाऱ्या पावसाने तालुक्यातील बहुतांशी ओढे-नाले, शेतीचे बांध तुडुंब भरून वाहताहेत . तीर्थक्षेत्र गुड्डापुर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वळसंग सोरडी रस्ता पुलावर पाणी आल्याने आज दुपारी पर्यंत वाहतुकीस बंद होता. तसेच कोळगिरी पुलावर पाणी आल्याने उमदी कडे जाणारी वाहतूक काही काळ बंद होती. दरीबडची भागात काही जुन्या घरांची पडझड झाली आहे.तर जत शहरातील शंकर कॉलनी भागात अनेकांच्या घरात पाणी घुसले, तसेच येथील गार्डनला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
तालुक्यात मंडळ निहाय झालेला पाऊस असा जत 78 मिमी, कुंभारी 28 मिमी, शेगाव 28 मिमी, माडग्याल 83 मिमी, मुचंडी 72 मिमी, डफळापुर 54 मिमी, संख 45 मिमी अशी नोंद झाली आहे.
खानापूर तालुक्यात गुरुवारी सायंकाळ पासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी देखील पाऊस होता. तीव्र उन्हाळ्याच्या झळा सहन करणाऱ्या जनतेला पावसाच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी पावसाने चांगले वातावरण तयार झाले आहे. घटमाथ्याच्या भागासह संपूर्ण तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी आहे.
कुंडल (पलूस) परीसरामध्ये काल सायंकाळी पाच वा. मेघगर्जनेसह वादाळी वारा व पाऊसास सुरुवात झाली. एक तासभर जोरदार पाऊस पडला. त्यानंतर आज सकाळपर्यंत एकसारखा मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरुच आहे.
कडेगाव तालुक्यात गुरूवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस अद्याप सुरूच आहे. आज सकाळपासुन पाऊस वाढला आहे. शेत मशागतीसाठी हा पाऊस ऊपयोगी ठरणार आहे.
वांगी परिसरात काल रात्रीपासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाचा जोर वाढत चालला असून लग्नाची आज मोठी तिथ असल्यामुळे वऱ्हाडी मंडळींची पुरती तारांबळ उडालेली आहे.
म्हैसाळसह परीसरात गुरूवार सायं. ५ पासून दमदार पाऊस पडला असून अद्याप ही रिमझिम सुरूच आहे. अखंड उन्हाळ्याच्या कालखंडातील हा पहिलाच मुसळधार पाऊस आहे.यामुळे परीसरात उन्हाने हैराण झालेल्या ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शिवाय या पावसामुळे विहीर, बोअरवेल यांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.