शिराळा/प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील भूस्खलन,दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे पश्चिम भागातील पाच वाडी व वस्तीवरील १७९ कुटुंबातील ६७९ नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. पश्चिम भागातील पाच वाड्यातील डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उन्माळे लागले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कुटुंबातील लोकांचे स्थलांतर केले आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, शिराळा तालुक्यात भूस्खलनाचा धोका मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिराळा पश्चिम भागातील १७८ कुटुंबातील ६६८ रहिवाशांना स्थलांतरित केले आहे. यामध्ये भाष्टेवस्ती येथील १२ कुटुंबातील ४९ व्यक्ती, कोकणेवाडी येथील ४७ कुटुंबे २७८, दामनवाडी येथील ०७ कुटुंबातील २६ लोकं तर मिरुखेवाडी येथे ५३ कुटुंब राहातं असून यामधील २०९ लोकांसह डफळेवाडी येथील २६ कुटुंबासह १०६ लोकांचा समावेश आहे.
याप्रमाणे संभाव्य अतिवृष्टीच्या धोक्याचा विचार करून सदर कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर सदर गावं शेतीप्रधान असल्याने येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांना आपापल्या शेती कामासाठी ये-जा करण्यासाठी वाहनांची व्यवस्था ही करण्यात आली आहे. सदर स्थलांतरित नागरिकांना चहा, नाष्टा, जेवण-खाणे या जीवनावश्यक वस्तूंची सुविधा शासनामार्फत करण्यात आली आहे. स्थलांतरित लोकांची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात . ग्रामसेवक, तलाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी या गावांमध्ये थांबून नागरिकांना सहकार्य व नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : पुन्हा अतिवृष्टी, पाऊस-वारा झोडपतोय!
शिराळा पश्चिम भागातील या भागात सध्या जमिनीला भेगा पडणे, झाडे वाकणे, अशा घटना घडत आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दखल घेतली आहे. तसेच चोवीस तास तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तर पुरपरस्थितीचा सामना करण्यासाठी, संवेदनशील मांगले, सागांव, कोकरुड, चरण, आरळा याठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणांच्या ग्रामपंचायतीस लाईफ जॅकेट, रिंग, रोप, बॅग्ज, मेगाफोन, बॅटरी हे साहित्य उपलब्ध केले आहे.
तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, शोध व सुटका पथक यांची माहिती संकलित करून त्यांना आपत्ती वेळी कोणत्याप्रकारे मदत कार्य करावयाचे याबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली आहे. गावनिहाय आराखडे करून ब्ल्यू व रेड लाईन मध्ये येणाऱ्या घरांची, नागरिकांची माहिती तयार केली आहे. बुलडोझर, पाण्याचे टँकर, अर्थमुव्हर, जनरेटर आदींचे नियोजन केले आहे. सांगाव, मराठेवाडी, काळूंद्रे, मांगले, देववाडी, कांदे, कोकरूड येथे पुराचा जास्त फटका बसला होता. मांगले, सांगाव, कोकरूड, आरळा, चरण या ठिकाणी सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे. तालुक्यातील बोटींची यशस्वी चाचणी घेण्यात आली असल्याचे ही तहसीलदार गणेश शिंदे यांनी सांगितले.
स्थलांतरित करण्यात आलेल्या सर्व लोकांची सोय प्रशासनाने करूंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात करण्यात आली असून शिराळा तालुक्यात अशा प्रकारे कोणत्याही गावात धोका दिसून आल्यास शिराळा तहसील कार्यालयास कळवावे. प्रशासनाच्या वतीने सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार सचिन कोकाटेसह अधिकारी उपस्थित होते.








