जत/प्रतिनिधी
जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा तुटलेल्या विजेच्या तारेला धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे. राजमाबी पिरसाब शेख (वय.६०, रा. साळमळगेवाडी, ता. जत) असे मयत झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत पोलिसात सफरफराज बाबासाहेब शेख यांनी माहिती दिली आहे.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजमाबी शेख ह्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्या चरवण्यासाठी शेतात गेल्या होत्या. दुपारी घरापासून काही अंतरावर असलेल्या खांडेकर यांच्या शेतात वादळी वार्याने पोलवरील मुख्य तार तुटून झाडावर लटकत होती. याच तारेचा धक्का राजमाबी यांना लागला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास खांडेकर यांच्या शेतातील लोकांनी ही घटना पाहिली. राजमाबी यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली. शिवाय, वायरमनला बोलावून मेन लाईनचा विद्यूत पुरवठा खंडित करून मृतदेह रात्री ९ वाजता शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे. सदरची घटना पोलिसात नोंद असून अधिक जत तपास पोलिस करत आहेत .









