कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : निर्धारित वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात सीबीआयला अपयश
वृत्तसंस्था / कोलकाता
काही महिन्यांपूर्वी कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी आणि या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना जामीन संमत करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात 90 दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र सादर न केल्याने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात येत आहे, असे कारण देण्यात आले आहे. तथापि, त्याची कारागृहातून सुटका होणार नाही. कारण त्यांच्यावर महाविद्यालयात आर्थिक भ्रष्टाचार केल्याचाही आरोप असून त्यात जामीन संमत झालेला नाही.
संदीप घोष यांना सीलदाह येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी जामीन संमत केला. त्याचप्रमाणे हे बलात्कार आणि हत्या प्रकरण ज्या दिवशी घडले, त्या दिवशी तेथील पोलीस स्थानकात अधिकारी पदी असणारे प्रभारी अभिजित मोंडाल यांनाही जमीन संमत करण्यात आला आहे. घोष यांच्यावर या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याचा तर मोंडाल यांच्यावर एफआयआर विलंबाने नोंद केल्याचा आरोप आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याचे आणि तिची हत्या करण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. ते 9 ऑगस्ट 2024 च्या मध्यरात्री घडले होते. या प्रकरणाची चौकशी कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविली होती. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करीत आहे. जामीन संमत होण्यापूर्वी मोंडाल आणि घोष यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मोंडाल यांची आता कारागृहातून सुटका होईल.
घोष यांची सुटका नाही
बलात्कार आणि हत्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी संदीप घोष यांना कारागृहातच रहावे लागणार आहे. कारण त्यांच्यावर महाविद्यालयात आर्थिक भ्रष्टाचार आणि गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. या आरोपतही त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या आरोपासंबंधात त्यांना अद्याप जामीन संमत झालेला नाही. त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता नाही.









