पुणे / प्रतिनिधी :
खडकी भागात एका लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात शिरलेल्या चोरटय़ांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रोहिदास सिंग (वय 30, सध्या रा. खडकी, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खडकीतील सेंट जोसेफ हायस्कूलसमोर या लष्करी अधिकाऱ्याचा बंगला आहे. चोरटे मध्यरात्री बंगला क्रमांक दहाच्या आवारात शिरले. चोरटय़ांनी बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेले. चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, पोलीस नाईक सारिका हरगुडे तपास करत आहेत.
पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. शासकीय कार्यालये, खासगी संस्था, तसेच बंगल्याच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेली आहेत. खडकीतील दारूगोळा कारखान्याच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली होती.








