चंदन हे त्याच्या गंधासाठी प्रसिद्ध आहे. चंदनाचा एक प्रकार असलेलं रक्तचंदन हे त्याच्या औषधी गुणांसाठी ओळखलं जातं. रक्तचंदनाची बाहुली उगाळून लेप तयार केला जातो. सारांश चंदन हे काही रूपाने फार देखणं नव्हे, पण त्याच्या सुगंधाला साक्षात् देवही भुलतो म्हणतात. शिवाय देवाच्या पूजेत त्याला चंदन विलेपन करणं हा एक आवश्यक उपचार आहे. म्हणून तर अगदी पहाटे पहाटे काकडआरतीच्या वेळीच
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला
अशी गोड विनंती करून चंदनाच्या सुवासाने त्याला हळुवार जागं केलं जातं. देवाला गेल्यावर किंवा अगदी घरच्या पूजेला बसल्यावरही देवस्थान जागृत करण्यासाठी आधी घणाघणा घंटा नाही वाजवायची! हळुवार सुगंधाने त्याला हलकेच जाग आणायची असं शास्त्र असतं. कारण चंदनाचा सुगंध हा मूलत: सात्त्विक लहरी असणारा समजला जातो. तो काही मोगऱ्याच्या गंधासारखा रोमँटिक नव्हे आणि सोनचाफ्यासारखा मादक तर नव्हेच नव्हे. म्हणून तो विष्णूचा प्रिय सुगंध समजला जातो. त्यामुळे
अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु
मी म्हणे गोपाळु आला गे माये
म्हणजेच अवचित सुटलेला आणि बेभान करून सोडणारा चंदनाचा परिमळ म्हणजेच सभोवती असणारं विष्णुतत्त्व होय! दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतील जंगलं ही चंदनाच्या झाडांनी बहुळ आहेत. तिथे चंदनाच्या लाकडापासून असंख्य गोष्टी फार उत्तम रीतीने घडवल्या जातात. त्या चंदनाची तस्करी होते. त्यापायी घडलेलं नाट्या सर्वांना परिचित आहे. चंदन एकदम राजकीय पातळीवर जाऊन खळबळ माजवून सोडतं कधीकधी ते असं. पण चंदनाचं आकर्षण मात्र कमी होत नाही.
ब्रह्मानंदाचा अनुभव पावून चुकलेल्या, कृतकृत्य झालेल्या आणि सहजसमाधी प्राप्त केलेल्या जिवाचा अनुभव ज्ञानेश्वर माऊलींनी उंबराच्या फुलाइतक्या दुर्मिळ शब्दांत सांगितला आहे.
अधिक देखणे तरी निरंजन पाहणे
योगिराज विनवणे मना आले वो माये
आणि या अभंगात अत्यंत सुरेख ओळी चंदनाचं वर्णन करतात.
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्या देखिला निराकार वो माये

निराकाराचा आकार दिसू लागणं म्हणजे जणु चंदनाच्या झाडाला फळं धरणं किंवा पिंपळाचा वृक्ष फुलून येणं. आयुष्याची ही कृतकृत्यताच असते. आता जगायचं ते केवळ हा आत्मानंद भोगत स्वस्थानी जाण्यापुरतंच. असं तृप्त जीवन जगणारे महात्मे आतून इतके शीतळ असतात की चंदनाचंच आयुष्य ते जगत असतात. लोककल्याणासाठी ते अखेरपर्यंत चंदनासारखेच झिजत असतात. आणि
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरूपीं वो माये
ही त्यांची मनोवस्था असते. आपल्या भारताच्या तपोभूमीत अशी माणसं कितीतरी होऊन गेली आहेत. ज्यांच्यासाठी बाकीबाब बोरकरांनी ‘चंदन होओनी अग्नी भोगावा’ ही ओळ म्हणून ठेवली आहे. दुसऱ्यासाठी अखंड झिजत रहाणाऱ्या माणसाला आपल्याकडे चंदनाची उपमा दिली जाते ती अशीच.
घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुणा
भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का
माउलींची ही अजून एक नितांतसुंदर रचना. अधिक देखणे पं. भीमसेन जोशीनी अधिकच देखणं केलंय आणि या रचनेला कंठी धरलंय गानकोकिळा लतादीदींनी! यातही ती विरहिणी म्हणते,
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का म्हणजेच सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरीही तो पोळतोच आहे. असह्य ताप देतो आहे. तिच्या जिवाला चैन पडत नाही. कारण तिला जिवाचा सखा कान्हाच हवा आहे. एकदा त्याची तहान लागली की अन्य कुठल्याही गोष्टीने ती कशी भागणार बरं? चराचराच्या मनात प्रणयाचे असह्य आवेग निर्माण करणारा आणि मीलनाच्या धुंदीपर्यंत तरंगतच घेऊन जाणारा तो कान्हा या उन्मादक वसंत ऋतूत अगदी निकट हवा आहे. वेगी भेटवा म्हणते ती. म्हणजे विरह किती असह्य होत असेल तिला?
हे झालं संतरचित विराण्यांचं. पण चंदनासारखा रंग हा अतिशय मोहक असतो याचं पहिलं दर्शन आपल्याला घडवलं ते,
चंदन सा बदन चंचल चितवन
भीगे से तेरा ये मुसकाना
मुझे दोष न देना जगवालों
हो जाए अगर दिल दीवाना
सरस्वतीचंद्र मधल्या या गीताने. यमनचा एक प्रसन्न आविष्कार असलेलं हे गीत चंदनासारखंच सुगंधी होऊन दरवळत रहातं. चंदनाचा हिशेब म्हटला तर काही लागता पुरवत नाही. कारण कौरुप्य, अर्थात कुरूप असणं आणि परमेश्वरी कृपा यांचा मेळ आपण घालू शकणार नाही. पण याच चंदनानं कुब्जेसारख्या अष्टावक्र कुरूप स्त्राrचं जीवन धन्य धन्य करून सोडलं. कंसासाठी चंदन उगाळून घेऊन चाललेल्या तिला वाटेत कृष्ण भेटतो काय, माझ्या अंगाला चंदन लाव म्हणून तिच्यावर कृपेचा वर्षाव करून तिला कृतार्थ करून सोडतो काय, सगळंच अलौकिक!
चंदनाचे हात पायही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग
संत तुकारामांची सुमन कल्याणपूर यांनी गायलेली रचना म्हणजे चंदनाच्या खोडाचं अंतर्बाह्य सुगंधी असण्याचं यथार्थ उदाहरण! सज्जन लोक कसे असतात हे दाखवण्यासाठी इतकी सुंदर उपमा नाही. चंदनाचं खोड हे जितकं उगाळावं तितका जास्त सुगंध दरवळू लागतो. साखर सर्वांगी गोडच असते. तसेच सज्जन लोक असतात. त्यांच्यात अवगुण शोधू जावे तरी मिळत नाहीत. आणि याचाच पुढचा आविष्कार म्हणजे
चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे
तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे
अगदी चंदनाच्या परिमळाचंही आम्हाला आता कौतुक नाही जितकं तुझ्या नामातल्या गोडीचं अप्रुप आहे. भाषेमधल्या अलंकरणाचं हे साजिरं रूप इतकं छान वाटतं! अगदी राजस सुकुमार मदनाचा पुतळा असलेल्या विठुरायाचं रूपडं
कस्तुरी मळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
हे जसं दिसतं ना, अगदी तसंच दिसतं ते. म्हणून की काय त्या गंधाला गंधाराची उपमा दिलेली आहे. ‘तुझ्या भाळी गंधाराचे गंध रेखवावे’ या ओळीत. चंदनाचा गंध काय, चंदनाचे उपचार काय किंवा त्याच्या आठवणी काय? प्रश्न एवढाच की ते देवासाठी असतं म्हणून ते इतकं सुंदर आणि सात्त्विक असतं, की सात्त्विक सुंदर निरहंकारी म्हणून देवाला प्रिय असतं?
– अॅड. अपर्णा परांजपे-प्रभू








