प्रशासन वाळू माफियांवर अंकुश ठेवणार ?
सातार्डा – प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘ रेड अलर्ट ‘ घोषित करण्यात आला असतानाही तेरेखोल नदी पात्रात दिवसाढवळ्या यांत्रिकी होड्यांच्या सहाय्याने अनधिकृत वाळू उपसा राजरोस सुरु आहे.धोका पत्करून झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील कामगार बेसुमार वाळू उत्खनन करत आहेत.तेरेखोल नदीपात्राची पाणी पातळी वाढली असतानाही वाळू माफियांच्या वरदहस्तामुळे परराज्यातील कामगारांच्या सहाय्याने मोठया प्रमाणात वाळू उत्खनन सुरु आहे. तेरेखोल पुलाच्या पायथ्याशी राजरोसपणे वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे तेरेखोल पुलाला धोका संभवत आहे.
शासनाने पुरप्रवण क्षेत्रातील नागरिकांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी पुराच्या पाण्यातून ये जा करू नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला तसेच नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक ती सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असताना शासनाच्या सूचना धुडकाऊन पुराने भरलेल्या तेरेखोल नदीपात्रात यांत्रिकी होड्यांच्या सहाय्याने वाळू काढली जात आहे.
सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात ‘ रेड अलर्ट ‘ घोषित केला आहे. सखल भागातील नागरिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींना दक्ष रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या असताना सातार्डा भागात तेरेखोल नदीपात्रात मुसळधार पावसात वाळू उपसा केला जात आहे.गोवा राज्याच्या हद्दीलगत तेरेखोल नदी किनारपट्टीलागत वाळूचे साठे केले जात आहेत. जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला असताना सातार्डा भागात राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु आहे. तेरेखोल नदीपात्रात पुराने पाण्याच्या पातळीमध्ये वेगाने वाढ होत असताना यांत्रिकी होड्यांच्या सहाय्याने सुरु असलेले वाळू उत्खनन धोकादायक आहे. शासनाने रेड अलर्ट घोषित केला असताना झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील कामगारांचा समावेश करून तेरेखोल नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.









