जळगाव / प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्याला मंजूर झालेले पशू वैदयकीय महाविद्यालय आता अकोल्याला होणार आहे. मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेले प्रकल्प जिल्ह्याबाहेर जात असल्याचा संताप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
खडसे म्हणाले, 1980 च्या दशकात जळगाव, नाशिक आणि औरंगाबाद ही तिन्ही शहरे एकाच स्तरावर होती. आज नाशिक आणि औरंगाबाद ही दोन्ही शहरे विकासात खूप पुढे निघून गेली आहेत तर जळगाव जैसे थे आहे. जिल्हयात नवे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न झाला तरी श्रेयवादातून तो हाणून पाडला जातो. परिणमत: तो प्रकल्प उभाच रहात नसल्याचे दिसून येते. जिल्हयाच्या विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे चित्र जळगाव जिल्हयाने कधी पाहिलेच नाही. किंबहूना जळगाव औदयोगिक वसाहतीत असलेले कारखाने बंद पाडण्यात काहींना स्वारस्य होते.
मी 1995 ते 98 च्या मंत्रीपदाच्या काळात वरणगावला पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले. 150 एकर जमीन या प्रकल्पासाठी दिली गेली. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते नियोजित केंद्राचे भूमीपूजन झाले. नंतर हा प्रकल्प जामखेडला हलवला गेला. जिल्हयाचे लोकप्रतिनिधी गप्प राहीले. नंतर युती सरकारच्या काळात कृषी अवजार निर्मिती कारखाना जिल्हयात सालबर्डी येथे मंजूर झाला, रावेर तालुक्मयात पाल येथे उद्यान विद्या महाविदयालय (हॉर्टीकल्चर कॉलेज) काढण्यास मंजूरी मिळाली. त्यासाठी 100 एकर जमीन मंजूर झाली. हे प्रकल्प अन्यत्र हलवले गेले. केळीवरील उतीसंवर्धन प्रकल्प (टिश्यूकल्चर) मंजूर झाला, चाळीसगाव तालुक्मयात लिंबूवर्गीय फळ संशोधन प्रकल्प मंजूर झाला, तो प्रत्यक्षात तो मार्गी लागला नाही, मुक्ताईनगरला टेक्सटाईल पार्कची घोषणा केली गेली होती तो अमरावतीला होत आहे.
मी माझ्या मंत्रीपदाच्या काळात जिल्हयासाठी जवळजवळ दहा प्रकल्प मंजूर करून आणले होते. मात्र, ते मार्गी लागावेत हे आजच्या पालकमंत्री अथवा लोकप्रतिनिधींना वाटले नाही याचे दु:ख आहे. मंगळवारी जिल्हयासाठी मंजूर झालेला पशू वैदयकीय महाविदयालयाचा प्रकल्प देखील अकोल्याला गेला. या बद्दल तीव्र संताप खडसे यांनी व्यक्त करत जिल्हयाच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवून एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.








