पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे प्रतिपादन : दुर्गामाता दौड सांगता समारंभात धारकऱ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : सनातन हिंदू धर्म हा जगातील सर्वोत्तम धर्म म्हणून ओळखला जातो. संपूर्ण विश्वाला तारण्याची शक्ती सनातन हिंदू धर्मात आहे. परंतु, आपल्यातीलच काही दलालांमुळे हिंदूंची दिशाभूल होत आहे. केवळ सत्ता आणि राजकारणासाठी हिंदूंचा वापर केला जात आहे. कोणत्याही पक्षाने आजवर सनातन हिंदू धर्मासाठी झोकून देऊन काम केलेले नाही. त्यामुळेच हिंदू धर्माच्या विरोधात अनेक संघटना उघडपणे काम करत आहेत. सनातन हिंदू धर्म जनमानसात रुजवायचा असेल तर शिवप्रतिष्ठानसारखे भगवाधारी तरुण गल्लोगल्ली तयार झाले पाहिजेत. भिडे गुरुजींनी धर्मसंस्काराची पिढी घडवणारा समाज तयार केल्याने शिवप्रतिष्ठान देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावे, अशी सदिच्छा दिल्ली येथील व्याख्याते व पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी दिली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रौप्यमहोत्सवी दौडच्या सांगता समारंभात ते बोलत होते. त्यांनी सनातन धर्म, आजचा तरुण तसेच देशासमोर असलेले धर्मसंकट या विषयांवर आपले विचार मांडले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या दौडची मंगळवारी सांगता झाली. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून दौडला प्रारंभ झाला. दिल्ली येथील पत्रकार व अभ्यासक पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ व पुणे येथील व्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढविण्यात आला. या दोन्ही मान्यवरांनी दौडमध्ये सहभाग दर्शविला. मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, केळकर बाग, समादेवी गल्ली, रिसालदार गल्ली, काकतीवेस, गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्लीमार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता झाली. रौप्यमहोत्सवी दौडच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ व ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांचा सत्कार केला. मोहिमेमध्ये सहभागी झालेले बेळगावचे पहिले धारकरी म्हणून बसवंत बाळनाईक व किरण गावडे यांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या दौडीच्या ध्वजाचे मानकरी सदाभाऊ जांगळे यांचाही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या हस्ते सत्कार झाला. बेळगाव ते केदारनाथ असा सायकल प्रवास करणारे धारकरी ऋतिक व पवन पाटील यांचा विशेष सन्मान झाला. यावेळी व्यासपीठावर डॉ. मोहन गुप्ता, डॉ. साळुंखे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यासह इतर उपस्थित होते.
गवळी गल्ली येथे जुन्या भिंतीला दिले किल्ल्याचे स्वरुप
दुर्गामाता दौडमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात असतात. मंगळवारी झालेल्या दौडमध्ये असे अनेक देखावे पाहायला मिळाले. गवळी गल्ली येथील तरुण मंडळाने जुन्या घराच्या भिंतीला किल्ल्याप्रमाणे रंगकाम केले आणि त्यामध्ये ‘गड आला पण सिंह गेला’ हा देखावा साकारला होता. गोंधळी गल्ली येथील वेताळ मंदिराजवळ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हुबेहूब वेशभूषा केलेला तरुण आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला. ठिकठिकाणी महिला व बालचमूने शिवकालीन सजीव देखावे सादर केले.