माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांची मुक्ताफळे, वाद आणखी चिघळणार
वृत्तसंस्था /चेन्नई
सनातन धर्म नष्ट झाला पाहिजे, या तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या प्रक्षोभक विधानामुळे निर्माण झालेले वादळ शमते न शमते तोच माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांच्या विधानामुळे आगीत तेल ओतले गेले आहे. सनातन धर्म हा एडस् किंवा महारोगाप्रमाणे एक सामाजिक कलंक आहे, असे विधान त्यांनी केले आहे. द्रविडर कझगम या संस्थेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विश्वकर्मा योजनेला विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या निदर्शनांच्या कार्यक्रमात ते गुरुवारी बोलत होते. उदयनिधी स्टॅलिन यांनी फारच सौम्य शब्दांमध्ये सनातन धर्मावर टीका केली. त्यांनी या धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया किंवा कोरोनाशी केली आणि अशा धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, अशी मागणी केली. खरे तर सनातन धर्म त्याहीपेक्षा मोठा सामाजिक कलंक आहे, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या भाषणात केले.
चर्चेचे आवाहन
राजा यांनी सनातन धर्मावर आणि वर्णाश्रमावर उघड चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा एकदा आव्हान दिले. आपण हे आव्हान आपले नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अनुमतीनेच ही विधाने केली आहेत. चर्चेच्या वेळी विरुद्ध बाजूने एक कोटी लोक जमा करावेत. तसेच शंकराचार्यांनाही आणावे. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची पुस्तके घेऊन येऊ, असे विधान त्यांनी केले.
पंतप्रधान मोदींवर टीका
सनातन धर्मावरील विकृत टीकेला चोख प्रत्युत्तर द्या, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनातन धर्माचे समर्थन करतात. ते सनातन धर्माचे समर्थन करत असतील तर त्यांना परदेशात दौरे करण्याचा अधिकार नाही. कारण धर्म मानणारा एक हिंदू समुद्र ओलांडू शकत नाही, अशीही मल्लिनाथी राजा यांनी केली.









