वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी सॅमसंग इंडियाने चालू वर्षात जवळपास 1 अब्ज डॉलर्सच्या गॅलेक्सी एम- श्रेणीतील स्मार्टफोनची विक्री करण्याचे ध्येय निश्चित केले आहे, अशी माहिती कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.
चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत कंपनीने समाधानकारक कामगिरी केली असून या दरम्यान वर्षाच्या आधारे ही वृद्धी 20 टक्क्यांनी अधिक राहिली असल्याची माहिती सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ संचालक आणि विपणन प्रमुख आदित्य बब्बर यांनी दिली. एम-श्रेणीतील गॅलेक्सी एम13 आणि गॅलेक्सी एम13 5-जी सपोर्ट असणाऱया स्मार्टफोन सादरीकरण कार्यक्रमादरम्यान त्यांनी माहिती दिली.
सॅमसंग एम 13 लाँच
सॅमसंगने सदरचा 5 जी फोन एलटीई कनेक्टीव्हिटीसह 13 हजार 999 रुपयांना उपलब्ध केला आहे. यातील एम 13 4जी फोन हा 11 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. 6.5 इंचाच्या स्क्रीनसह ग्लोरिला ग्लास 3 संरक्षणासह फोन मिळणार आहे. 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह 5 हजार एमएएच बॅटरीची जोड या फोनला असणार आहे.









