वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियाची दिग्गज स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ही भारतात स्मार्टफोन असेंबल (जोडणी)करुन विदेशात पाठवणारी सर्वात मोठी आघाडीवरची कंपनी बनली आहे. सॅमसंगने इतर सर्व स्पर्धक कंपन्यांना याबाबतीत मागे टाकले आहे. तैवानमधील फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन देशात अॅपलसाठी आयफोन असेंबल करतात.
एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटलिजन्सनुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सॅमसंगने भारतातून 4.09 अब्ज डॉलर्सच्या स्मार्टफोन्सची निर्यात केली आहे. 2021 च्या तुलनेत निर्यातीत 42 टक्के वाढ राहिली आहे. 2021 मध्ये सॅमसंगने 2.8 अब्ज डॉलर्सचे स्मार्टफोन निर्यात केले होते. 2018 मध्ये पाहिल्यास सॅमसंगची निर्यात मात्र 0.7 अब्ज डॉलर्सची होती. जागतिक स्तरावर कंपनीने मोबाइल डिव्हाइसच्या निर्यातीत भारताचा वाटा 18 टक्के आहे. तर दुसरीकडे सॅमसंग भारतात तयार केलेले मोबाइल फोन्स सर्वाधिक व्हिएतनामला निर्यात करते.
अॅपलची उत्पन्नात दमदार कामगिरी
अॅपलने दुसरीकडे भारतातून जून तिमाहीत विक्रमी स्तरावर उत्पन्न मिळवले असल्याचे समजते. आयफोनच्या दमदार विक्रीच्या जोरावर कंपनीने भारतात जूनअखेरच्या तिमाहीत विक्रमी उत्पन्न प्राप्त केले आहे. जगातील दुसऱ्या नंबरची स्मार्टफोन कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी कंपनीच्या कामगिरीचे दिलखुलासपणे कौतुक केले आहे. उत्पन्नात तिमाहीत कंपनीने दोनअंकी वाढ दर्शवली आहे.