ग्रेटर नोएडा :
कोरियन इलेक्ट्रॉनिक्स निर्माती कंपनी सॅमसंगने भारतामध्ये लॅपटॉप निर्मितीच्या कार्याला सुरुवात केली आहे. कंपनीचा लॅपटॉप निर्मितीचा कारखाना ग्रेटर नोएडामध्ये असून यामध्ये उत्पादनांच्या निर्मितीमध्ये वाढ करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्षांनी घेतली भेट
लॅपटॉप निर्मितीच्या कार्याला सुरुवात करण्यात आली असून आगामी काळामध्ये इतर उत्पादनांच्या निर्मितीलाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांची सॅमसंगचे दक्षिण पश्चिम आशिया अध्यक्ष आणि सीईओ जे. बी. पार्क आणि सॅमसंगचे दक्षिण पश्चिम आशिया कॉर्पोरेट उपाध्यक्ष एस. पी. चून यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत उत्पादनाबाबत व इतर मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
सॅमसंगचा कारभार
सॅमसंग ही कंपनी पहिली जागतिक कंपनी आहे जिने भारतामध्ये 1996 मध्ये उत्पादन निर्मिती कार्याला सुरुवात केली आहे. जागतिक स्तरावर पाहता सॅमसंग ही दुसरी मोठी मोबाईल फोन निर्माती कंपनी असून निर्यातीमध्ये सुद्धा दुसऱ्या नंबरची कंपनी मानली जाते. पहिल्या नंबर वरती अर्थातच एप्पल ही कंपनी आहे.









