ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. हा अपघातानंतर खा. संजय राऊत यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करत सरकारवर निशाणा साधला. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे या महामार्गावर सतत अपघात होत असावेत, असं विधान राऊत यांनी केलं आहे.
राऊत म्हणाले, या अपघातात ज्या 26 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला, त्यांच्याविषयी मनात संवेदना आहेत. त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. या महामार्गावर गेल्या वर्षभरात अनेक अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी या सरकारने मनमानी केली, त्याच्या अनेक गोष्टी बाहेर येतील. या महामार्गावरील वेगमर्यादेसंदर्भात आम्ही अनेकदा सरकारकडे मागणी केली, मात्र, सरकार त्याकडे लक्ष्य देत नाही. मृत्यू होत आहेत हे काही चांगलं नाही. किती वेळा श्रद्धांजली वाहायची?
भ्रष्टाचारातून निर्माण झालेला हा रस्ता आहे, असं मला वाटतं. अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने घेण्यात आल्या. अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यात मला दिसत आहेत. त्यामुळे हा अपघात होत नाही ना, असं मला वाटतं, असेही राऊत म्हणाले.