आमदार गोविंद गावडे यांची चौकशी करण्याची मागणी
पणजी : समृद्धी जीवन फूड्स इंडिया लि. यांनी गोव्यात गावागावात व्यवसाय सुरू केलेला होता. यातून 100 कोटी ऊपयांचा चुना लावून या संस्थेने पलायन केले आहे. महाराष्ट्रात या संस्थेचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे या कंपनीचे धागेधोरे महाराष्ट्रात शोधून काढणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी काल, गुऊवारी सभागृहात केली. जलस्त्रोत, सहकार खात्यावर बोलताना आमदार गावडे यांनी सांगितले की, समृद्धी जीवन फूड्स इंडिया लि. या कंपनीने काही वर्षांपूर्वी गोव्यात उद्योग सुरू केला होता. हा उद्योग सुरू झाल्यानंतर यामध्ये गोमंतकीय नागरिकही गुंतले होते. यामध्ये गोमंतकीय बांधवांचा पैसा बुडाला आहे. त्यामुळे सहकार खात्याने याकडे लक्ष द्यायला हवे. गृह आणि कायदा खात्यानेही या कंपनीविषयकच्या कायदेशीर बाबी तपासणे गरजेचे आहे.
काही एजंट आता याच कंपनीच्या माध्यमातून आणखी एक कंपनी गोव्यात स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असेही आमदार गोविंद गावडे यांनी सभागृहात सांगितले. जलस्रोत खात्यातर्फे सुरू असलेली कामे ही शेती किंवा बांध बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. परंतु ही कामे करताना त्यांची वेळ योग्य ठरत नाही. कारण डिसेंबर ते एप्रिल या दरम्यानच ही कामे करावी लागतात. परंतु या खात्याकडे कामांची निविदा मंजूर होईपर्यंत पावसाळा येतो. त्यामुळे कामे करताना अडचणी येतात. या खात्यातर्फे करण्यात येणारी कामे आणि त्यांची निविदा मंजुरीसाठी वेळ काढता कामा नये, असे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले. आपल्या प्रियोग मतदारसंघात शितोळे तळे आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. जलस्रोतांसाठी हे तळे महत्त्वाचे असल्याने त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात पाणी मिळविण्यासाठी होणार आहे. म्हणून सरकारने हे दुर्लक्षित तळे बांधून द्यावे, अशी मागणी आमदार गावडे यांनी सभागृहात केली.









