येथील सम्राट फ्रेंड्स सर्कलचा हा बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहे
By : गौतमी शिकलगार
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक असा श्रीगणेश आहे, तो कोणत्याही मंडपात नव्हे, तर चक्क एका वृक्षाच्या फांदीवर विराजमान आहे. सम्राटनगर येथील सम्राट फ्रेंड्स सर्कलचा हा बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहे. एवढेच नव्हे, तर गेली 40 वर्षे सामाजिक कार्यात हे मंडळ अग्रेसर आहे.
1985 मध्ये तरुणांनी एकत्र येऊन या श्रीगणेशाची स्थापना चक्क झाडावर केली, ती पर्यावरण रक्षणाचा, वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी. विशेष म्हणजे यात झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये, यासाठी काळजी घेतली गेली. झाडावर मोळा किंवा तार न लावता खास पायाड लावून बाप्पाची मूर्ती बसवली जाते.
सुरुवातीच्या काळात शिडी लावून बाप्पाची आरती केली जायची. आता हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. मंडळाने डीजेमुक्त आगमन आणि विसर्जन सोहळ्याचा पायंडा पाडला आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शांततेत बाप्पाचे स्वागत केले जाते.
तसेच निरोपही दिला जातो. याशिवाय, देखाव्यांवर आणि सजावटीवर होणारा खर्च वाचवून त्याचा उपयोग समाजकार्यासाठी केला जातो. मंडळाने गणेशाला नारळ, हार, तुरे अर्पण करण्याऐवजी वह्या–पेन आणण्याचे आवाहन केले. या वह्या–पेन विद्यार्थ्यांना देऊन शैक्षणिक मदत दिली जाते.
समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखत सम्राट फ्रेंडस् सर्कलने अनेक संकटांच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. 2019 च्या पूर परिस्थितीमध्ये लोकांना स्थलांतर करण्यासाठी शेल्टरची सोय केली. तसेच त्यांना अन्नधान्य वाटले. कोरोनाच्या कठीण काळातही मंडळाने गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
गणेशोत्सवादरम्यान मंडळातर्फे विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबिर, मेडिकल चेकअप वॅ ढम्पमधून समाजातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. यासोबत स्मशानभूमीत शेणी दान करून सामाजिक सलोखा राखण्याचे वेगळे उदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे.
दरवर्षी दिवाळीच्या सणाला शेंडा पार्क येथील कुष्ठरूग्णांना फराळवाटप करून मंडळाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा करतात. मंडळाची ही सर्व विधायक कामे माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या संकल्पनेतून सुरू झाली. त्यांनीच गणेशोत्सव आणि समाजसेवा यांची सांगड घातली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महानगरपालिकेने या मंडळाला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
“हार–तुऱ्यापेक्षा महानगरपालिका कामांचा वसा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वही–पेन द्या. डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे तरूण मंडळांनी विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची गरज आहे.”
– कपिल मोहिते, अध्यक्ष, सम्राट फ्रेंड्स सर्कल








