प्रकाश डांगे यांना शहर जिल्हाध्यक्षपदी पुन्हा संधी
सांगली :
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशातील 58 संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षपदांची घोषणा पक्षाचे निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी नुकतीच केली आहे. युवा नेते सम्राट महाडिक यांच्या खांद्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली असून त्यांची या निवडणूक प्रक्रियेत वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाबरोबर राहण्याचा आणि महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्याचा त्यांना फायदा झाला आहे तर शहर जिल्हाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे प्रकाश ढंग यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
पक्षाच्या निरीक्षकांनी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती आणि त्यामध्ये जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यापैकी प्रत्येक उमेदवाराला पसंती क्रमानुसार मते देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती.
सम्राट महाडिक यांची या निवडीत झालेली वाईल्ड कार्ड एन्ट्री ही पश्चिम महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणार आहे. महाडिक परिवाराचे राजकीय वलय आणि त्यांचा प्रदीर्घ संघर्ष लक्षात घेता त्यांच्या परिवारात सत्ताधारी पक्षाचे आलेले हे महत्त्वाचे पद ठरणार आहे. सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक यांनी वाळवा शिराळा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पक्षाच्या हितासाठी कामगिरी बजावली असली तरी त्यांची अचानक झालेली निवड पक्षात समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरण्याबरोबरच महाडिक यांच्या कार्यकर्त्यांना सुखावणारी ठरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या वादावर पक्षाने तोडगा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख या दोघांसह मिलिंद कोरे यांनी काळेबाग यांच्या नावावर चर्चा झाली होती. मात्र महाडिक परिवाराच्या वाइल्ड कार्ड एन्ट्री मुळे या सर्व नावांना वेगळा पर्याय पक्षाने दिला असून पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपद वाळवा, शिराळा तालुक्यात सक्रिय व्यक्तीकडेच सोपवण्यात आले आहे.
सांगली शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी आपणास फार कमी कालावधी मिळाला असून फेरनिवड केली जावी अशी प्रकाश ढंग यांनी मागणी केली होती. त्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पदासाठी पृथ्वीराज पवार, स्वाती शिंदे, विश्वजीत पाटील आणि इतर इच्छुक होते. शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी रिंग करून मतदान होऊन सुद्धा पक्षाने अंतिम क्षणी आपल्या पूर्वीच्या शिलेदारावर जबाबदारी देणे निश्चित केले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका चार महिन्यांवर असताना झालेल्या या निवडीमुळे पक्षांतर्गत यंत्रणेला गती देणे भाजपला सोयीचे झाले आहे.








