वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय अनुसूचित जाती (एससी) आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला नजरेसमोर ठेवून घेण्यात आला आहे. सांपला यांना होशियारपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. तर केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे. सद्यकाळात प्रकाश हे केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे पंजाबमधील एकमेव नेते आहेत. प्रकाश यांच्याजागी आता राज्यातील अन्य नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे मानले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षनेतृत्वाने विजय सांपला यांना घटनात्मक पदापासून मुक्त केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या गुरदासपूर येथील सभेवेळी देखील सांपला हेच सक्रीय दिसून आले होते. होशियारपूरमध्ये सांपला यांची पोस्टर्स देखील झळकली आहेत.









