समीर धावस्कर, दिनकर सावंत दोघेही सांखळीतील : आतापर्यंत चार कोटी रुपयांचा घातला गंडा

पणजी : सरकारी नोकरी देण्यासाठी किंवा अन्य सरकारी कामे करुन देण्यासाठी सरकारच्या नावाखाली अनेक गोमंतकीयांना कोट्यावधी ऊपयांचा गंडा घालणाऱ्या दोन संशयितांना पणजी पोलिसांनी काल शुक्रवारी अटक केली. त्यांना अटक झाल्याची माहिती मिळताच ज्यांची फसवणूक झाली त्यातील अनेकजणांनी पणजी पोलिसस्थानक गाठून आपली व्यथा मांडली. त्यातील अनेकांच्या तक्रारींनुसार या दोघांनी मिळून चार कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचे सायंकाळपर्यंत उघड झाले. येत्या काही दिवसांत हा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये समीर धावस्कर (46 वर्षे, धावस्करवाडा, कारापूर-साखळी), दिनकर सावंत (48 वर्षे, सर्वण सांखळी) यांचा समावेश आहे.
खासगी नोकरीत समीर धावस्कर
समीर धावस्कर हा खाजगी नोकरी करीत आहे. राज्याचे मुख्य सचिव तसेच सरकारातील काही मंत्र्यांशी आपली चांगली ओळख असून सरकारी नोकरी तसेच अन्य कोणतेही सरकारी कामे करुन देतो, असे सांगून तो लोकांकाडून लाखो रुपये उकळत होता.
वीज खात्यातून निलंबीत दिनकर
दिनकर सावंत हा वीज खात्यात नोकरीला होता. तिथे त्याला निलंबीत करण्यात आल्यानंतर तो आणि समीर धावस्कर मिळून लोकांना लाखो रुपयांच्या ‘टोप्या’ घालण्याचे काम करू लागले. लोकांच्या समोर दिनकर हा एक आएएस अधिकारी असल्याचे भासवत होता. समीर धावस्करशी बोलताना तो स्वत: आयएएस असल्याचे भासवत होता, त्यामुळे समोरच्या माणसाचा समीर सहजपणे विश्वास संपादन करीत होता.
उजगाव येथील मुकेश नाईकचे धाडस
उजगाव येथील मुकेश नाईक यांनी 31 मार्च 2023 रोजी पणजी पोलीस स्थानकात संशयितांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पणजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये टॅक्सी सेवेचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने मुकेश नाईक याला या जोडगोळीने 10 लाख 55 हजार ऊपयांना गंडा घातला होता. मुकेश नाईक यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करताच पोलिसांनी भादंसंच्या 419 व 420 कलमाखाली गुन्हा नोंद केला आणि शुक्रवारी कारवाई फत्ते करुन दोघांनाही गजाआड करण्यात यश मिळविले.
दोघांच्याही आवळल्या मुसक्या
गुन्हा तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर पणजी पोलिसानी संशयितांचा शोध घेणे सुऊ केले. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर काही दिवसांपासून संशयित लपून राहिले होते. अखेर समीर धावस्कर याला शिरगाव येथे तर दिनकर सावंत याला पणजीत अटक करण्यात आली.
मुख्य सचिवांच्या बंगल्यापर्यंत…
एखाद्या व्यक्तीला नोकरी देण्याचे आमिष दाखविल्यानंतर तो त्या व्यक्तीला मुख्य सचिवांच्या बंगल्यापर्यंत घेऊन जात होता, मात्र त्याने कधीही कोणत्याही व्यक्तीला मुख्य सचिवांची भेट घालून दिली नाही. सरकारी कार्यालयातील त्याच्या हालचाली आणि त्याची ओळख पाहून सरकारी नोकरीच्या अपेक्षेत असलेले युवक सहजपणे त्याच्या चालाखिला बळी पडत होते.
समीर धावस्करचा रुबाब पहा…
ज्या व्यक्तीची फसवणूक झाली आहे ती व्यक्ती आणि समीर धावस्कर एका कारमधून जात होते. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्यांना अडविले होते. त्यानंतर समीर धावस्कर याने त्या पोलिसाला राजभवनचे आयकार्ड दाखविले होते. तसेच ‘बंदोबस्त सोडून इकडे काय करतोस तू?’ असे उलट त्या पोलिसाला विचारलेही होते. एवढेच नव्हे, तर त्यावेळेला त्या पोलिसाने समीरला चक्क सलाम ठोकला होता. हा प्रकार पाहून गाडीत असलेल्या त्या व्यक्तीचा विश्वास बसला आणि त्याने त्याला मोठ्या पदाची नोकरी मिळवून देण्यासाठी 15 लाख ऊपये दिले. हे सारे प्रकरण आता त्या फसवणूक झालेल्या युवकाने पोलिसांना सांगितले आहे.
अनेकांना दिली बनावट नियुक्तीपत्रे
सरकारी नोकरीसाठी कुणी समीर धावस्करकडे संपर्क केला तर तो त्या माणसाला संबंधीत कार्यालयात घेऊन जातो आणि आपली तेथील ओळख दाखवतो. नंतर काही दिवसांनी नोकरीचे आदेश पत्र त्याला नेऊन देतो. काही लाख अगोदर घेतो आणि उर्वरीत लाखो रुपये नियुक्तीपत्र दिल्यानंतर घेत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकार घडल होते. पणजी पोलीस स्थाकाचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मयुर पणशीकर व त्यांची टीम पुढील तपास करीत आहेत.
समीरकडे राजभवन कर्मचारी आयकार्ड
समीर धावस्कर याची काही सरकारी अधिकाऱ्यांशी ओळख होती, त्याचा पायदा घेऊन तो आपले काम साध्य करीत होता. आपण राजभवनमध्ये काम करत असल्याचेही तो सांगत होता. त्याच्याकडे राजभवनचे आयकार्डही होते.
डिचोली, फोंडा पोलिनांनी गुन्हे नोंदविले नाही
समीर धावस्कर व दिनकर सावंत यांच्या विरोधात डिचोली, फोंडा पोलीस स्थानकात अनेकांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न यापुर्वीच केला होता, मात्र तेथील पोलीस गुन्हा नोंद करुन घेत नव्हते. त्यामुळे या संशयितांनी आपले काम सुऊच ठेवले होते. डिचोली, फोंडा पोलिसांनी वेळीच गुन्हा नोंद करुन संशयितांचा तपास लावला असता तर हे प्रकरण इतके मोठे झाले नसते. पणजी पोलिसांनी या प्रकरणी त्वरित लक्ष घालून या दोघांच्या कारनाम्यांचा पर्दाफाश केला.
बनावट नियुक्तीपत्र अस्सल नियुक्तीपत्रासारखेच !
संशयित देत असलेले बनावट नियुक्तीपत्र हे तंतोतंत खऱ्या नियुक्तीपत्रासारखेच वाटते. त्याच्यावरील अधिकाऱ्याची सही मूळ सहीसारखीच आहे. तसेच टायपिंगचा फाँटही सरकारी वापरातीलच वाटतो. पत्राची सगळी रचना सरकारी नियुक्ती पत्रासारखीच आहे. त्यामध्ये नमूद करण्यात येणाऱ्या विशिष्ट बाबीही सरकारी नियुक्तीपत्रासारख्याच आहेत. त्यामुळे असे सरकारी नियुक्तीपत्रासारखेच नियुक्तीपत्र तयार करणारी व्यक्ती कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात कोणा सरकारी अधिकाऱ्याचाही सहभाग आहे की काय, असा संशय बळावला असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.









