सर्व याचिकांची यादी करण्याचे आदेश ः 13 मार्चला सुनावणी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
समलैंगिक विवाहांना मान्यता मिळविण्यासंबंधी वेगवेगळय़ा न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका स्वतःकडे हस्तांतरित (वर्ग) करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. वेगवेगळय़ा उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या किंवा दाखल झालेल्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलत यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर प्रकरणावर 13 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
समलैंगिक संबंधांच्या मुद्दय़ावर मंगळवारी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. यावेळी खंडपीठाने सर्व याचिकांची पडताळणी करत 6 जानेवारीला सुनावणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्व याचिकांचा आढावा घेऊन एकत्रित सुनावणीसाठी याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्राकडे मागितला सविस्तर अहवाल
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला समलैंगिक विवाह मुद्दय़ावर सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. या प्रकरणाची शेवटची सुनावणी 14 डिसेंबर 2022 रोजी झाली होती. यादरम्यान, न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीसही बजावली होती आणि विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी नव्या याचिकेवर उत्तर मागितले होते. त्यापूर्वीही 25 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने आणखी एका समलिंगी जोडप्याच्या याचिकेवर केंद्राला नोटीस बजावत केंद्राकडून 4 आठवडय़ात उत्तर मागितले होते. वरि÷ वकील आनंद ग्रोव्हर यांनी सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी केली. यावर सरन्यायाधीशांनी सुनावणी होईल तेव्हा आम्ही यावर विचार करू, असे सांगितले होते.
दिल्ली-केरळ उच्च न्यायालयात 9 याचिका
विशेष विवाह कायदा, विदेशी विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहांना मान्यता देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयात 9 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ही सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी पावले उचलली जात असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
समलैंगिकता म्हणजे काय?
समलैंगिकता म्हणजे एखादी व्यक्ती लैंगिक आणि रोमँटिकरीत्या समान लिंगाच्या लोकांकडे आकर्षित होते. जर पुरुष पुरुषांकडे आकर्षित होत असतील तर त्यांना गे किंवा होमोसेक्शुअल समलैंगिक म्हणतात. तसेच एखादी स्त्री दुसऱया स्त्रीकडे आकर्षित होत असेल तर तिला लेस्बियन म्हणतात. जे लोक स्त्री आणि पुरुष दोघांकडे आकर्षित होतात त्यांना उभयलिंगी (बायसेक्शुअल) म्हणतात. सद्दय़स्थितीत जगातील 32 देशांमध्ये समलिंगी विवाहाला मान्यता आहे. तर, 120 देशांमध्ये समलैंगिकता हा गुन्हा आहे. मात्र, समलैंगिकांच्या हक्कांबाबत जगभरात तीन प्रकारचे कायदे आहेत. काही देशांमध्ये समलिंगी विवाह कायदेशीर आहे. तर काही देशांमध्ये समलिंगी संबंध कायदेशीर असूनही लग्नाला परवानगी नाही. नेदरलँडमध्ये 2001 मध्ये पहिल्यांदा समलिंगी विवाहाला परवानगी देण्यात आली होती. येमेन, इराण यासारख्या 13 देशांमध्ये समलैंगिक संबंधांबाबत कठोर कायदे असून फाशीची शिक्षाही सुनावली जाते.









