भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ यात्रा : तिरंगा ध्वज, विविध वेशभूषेतील मुलांचा सहभाग
वार्ताहर/सांबरा
भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ सांबरा ते पंत बाळेकुंद्री दरम्यान काढलेल्या तिरंगा यात्रेतून राष्ट्रीय एकात्मता व जाज्ज्वल्य देश प्रेमाचे दर्शन घडविण्यात आले. माजी सैनिक, शेतकरी, देशप्रेमी नागरिक, शाळकरी मुले, महिला व युवक तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यात्रेमधील मोठा तिरंगा ध्वज, आकर्षक बैलजोडी व विविध वेशभूषेतील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. भाजपा ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. प्रारंभी छ. शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले. क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा, जगत ज्योती बसवेश्वर व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. व भारत मातेचे पूजन करून वंदे मातरम म्हणून तिरंगा यात्रेला सुरुवात केली.
तिरंगा यात्रेचे सभेमध्ये रुपांतर
यात्रेमध्ये माजी सैनिक संघटना, शाळकरी मुले, महिला, शेतकरी व असंख्य युवक तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान आदी घोषणा दिल्या. यात्रेमध्ये आकर्षक बैलजोडी सहभागी झाली होती. त्या पाठोपाठ ट्रॅक्टरमध्ये विविध क्रांतीकारकांच्या वेशभूषेतील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तिरंगा यात्रा बाळेकुंद्री खुर्द येथे आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून भव्य स्वागत करण्यात आले. यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते. पंत बाळेकुंद्री येथे तिरंगा यात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले याप्रसंगी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता सीमेवर अहोरात्र रक्षण करतात. त्यांच्या बलिदानामुळेच आम्ही आज देशांमध्ये सुरक्षित आहोत.
भारतीय सैनिकांचे बलिदान फार मोठे
युवराज जाधव म्हणाले, आपल्या भारतीय सैनिकांचे बलिदान फार मोठे आहे. ते डोळ्यामध्ये तेल घालून सीमेवर रक्षण करतात. त्यामुळेच आपला भारत देश सुरक्षित आहे. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. माजी सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तिरंगा यात्रेमध्ये भाजपा ओबीसी जिल्हा अध्यक्ष उमेश पुरी, सांबरा ग्रामपंचायत अध्यक्षा रचना गावडे, भाजपा ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव, मल्लाप्पा कांबळे, मोहन जोई यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.









