अज्ञात भामट्याचा मदतीच्या बहाण्याने कारनामा
बेळगाव : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे लक्ष विचलित करून त्याचे एटीएम कार्ड व पासवर्ड मिळवून टप्प्याटप्प्याने 70 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी सांबरा येथे ही घटना घडली असून गुरुवारी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. असगरअली काशीम शिगीहळ्ळी (वय 73) राहणार सांबरा या वृद्धाने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार दि. 17 जुलै रोजी मारिहाळ पोलीस स्थानकात अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सांबरा येथील इंडिया एटीएममध्ये असगरअली पैसे काढण्यासाठी गेले होते. याचवेळी सुमारे 22 ते 23 वर्षीय अनोळखी तरुणही तेथे आला होता. लक्ष विचलित करून किंवा असगरअली यांना फसवून त्या अज्ञाताने त्यांचे एटीएम कार्ड व पासवर्ड मिळविला होता. हिरवे टी-शर्ट, काळी हाफ पँट व लाल बॅगसह एटीएमवर आलेल्या अज्ञात भामट्याने टप्प्याटप्प्याने असगरअली यांच्या मुलाच्या एटीएम कार्डमधून 70 हजार 535 रुपये काढले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे.









