वृत्तसंस्था/ संभल
उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीत रविवारी न्यायालयीन निर्देशानुसार रंगकाम सुरू झाले. सकाळी 9 वाजता एएसआयच्या देखरेखीखाली 10 कामगार तैनात करण्यात आले. प्रथम मशिदीच्या बाहेरील भिंती स्वच्छ करण्यात आल्या, नंतर रंगकाम सुरू झाले. याप्रसंगी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) पथकासह मोठ्या संख्येने पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. मशिदीचे रंगकाम करण्यासाठी सुमारे 10 दिवस लागतील, असे रंगकाम करणाऱ्या कंत्राटदाराने सांगितले.
उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या बाह्या भागाची रंगसफेदी करावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला दिला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने रंगरंगोटी करण्यासाठी सहमती दर्शवली होती. याचदरम्यान, येथे नाथ पंथाचे महंत बालयोगी दीनानाथ यांनी मशिदीला भगवे रंग देण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रही लिहिले आहे. तथापि, रंगरंगोटीनंतरही मशिदीचा रंग पूर्वीसारखाच राहील. रंगकाम करूनही मशिदीचे रुप बदलणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.









