ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. हातातोंडाशी आलेली उभी पिकं मातीमोल झाली असून, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. मात्र, सरकारने अद्याप शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही मदत पोहचवलेली नाही. त्यावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल”.
अधिक वाचा : राज्यात आणखी दोन दिवस ‘यलो अलर्ट’
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी यासारखी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. केळी, द्राक्ष, आंबा यासारख्या फळबागांनाही फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, सरकारच्या मदतीकडे त्याचे डोळे लागले आहेत.








