मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे छत्रपती आक्रमक
कोल्हापूर प्रतिनिधी
मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित आहेत. त्यामुळे समाजाचे तेच ते प्रश्न पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला सांगणे म्हणजे मुर्खपणा असल्याचे परखड मत संभाजीराजे छत्रपती यांनी औरंगाबाद येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. तसेच मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत त्यांनी तातडीने बैठक घेवून ते सोडविण्यासाठी प्रक्रीया राबवावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी यावेळी केली.
संभाजीराजे म्हणाले, युतीच्या सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाच्या बाजूने आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. मराठा समाजातील मागास, वंचित घटकाला आरक्षण मिळावे अशी समाजाची माफक अपेक्षा आहे. आरक्षण कशापद्धतीने द्यायचे हे उपमुख्यमंत्र्यांना माहित आहे. त्यामुळे आता आरक्षणासह अन्य प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा न करता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी कृती करावी, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
मागासवर्ग आयोगाची स्थापना करा.
मराठा आरक्षणासाठी सरकारल अल्टीमेटम देवून काही उपयोग नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजा हा पुढारलेला समाज असल्याने त्यांना आरक्षणाची गरजे नाही असे म्हटले आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा समाज हा सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे. यासाठी मागासवर्ग आयोगाची नेमणूक करणे आवश्यक आहे. आयोगाच्या स्थापनेनंतर अहवाल तयार करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापन तत्काळ करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारने काही केले नाही
सारथी संस्था, अण्णसाहेब पाटील महामंडळाला निधी यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही मागणी महाविकास आघाडी सरकारने पूर्ण केली नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत केलेले आमरण उपोषण एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच सोडले. त्यामुळे त्यांना समाजाचे प्रश्न माहीत आहेत. सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न सोडवून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
अन्यथा स्वराज्य संघटना आहेच…
मराठा समाजाच्या मागण्या शिंदे-फडणवीस सरकारला माहित आहेत. त्यामुळे त्यांनी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने बैठक घ्यावी, अन्यथा स्वराज्य संघटना आहेच, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारनेही मराठा समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितले.