5 जानेवारी रोजी भव्य सोहळा, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व महाराष्ट्राचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रविवारी आयोजित बैठकीत देण्यात आली.
शिवशंभो तीर्थ स्मारकाचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात रविवारी अनगोळ परिसरातील शिवभक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आदिनाथ भवन येथे झालेल्या बैठकीला परिसरातील लोकप्रतिनिधी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा भव्यदिव्य करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. अनगोळ नाका येथून मिरवणुकीला सुरुवात होणार असून ढोल ताशा, मर्दानी खेळ, विद्युत रोषणाई, पोवाडे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा झाली.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी युवकांच्या कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी भाऊ कावळे, जितेंद्र देवण, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, प्रफुल्ल सोमण्णाचे, रवि बाबले, अरुण गावडे, उमेश कुऱ्याळकर, दीपक सोमण्णाचे, परशराम शिंदोळकर, वसंत ताशिलदार, यांनी मनोगत व्यक्त करत सोहळा यशस्वी करण्याचा निर्णय घेतला. बैठकीला वसंत ताशिलदार, नगरसेवक श्रीशैल कांबळे, अभिजित जवळकर, बी. ए. येतोजी, गजानन चौगुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









