ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत युती केलेली असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) युतीची घोषणा शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केली.
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती देखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.
हे ही वाचा : गुलाम नबी काँग्रेसमधून ‘आझाद’; सोनिया गांधींना पत्र पाठवत राजीनामा
या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड यांच्याशी युती करत असल्याचे सांगितले. तसेच, “लढावय्या सहकाऱ्यांचे स्वागत असा उल्लेख केला. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही नसताना सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटते”, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
“आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू”
“आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.
“भाजप संघाची विचारधारा मानत नाही. असा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजप संघाला मानतं मग तसं वागत का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर बर झालं शिंदे गेले असंगाशी संग तुटला असे म्हणत त्यांनी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला.
“महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना राज्यात एकत्र येणार आहे. तसेच, येत्या काळात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र युतीने काम करणार आहे”, असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आकरे यांनी म्हटले.