प्रशिक्षणप्राप्त 2,614 पुरुष-महिला अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींचा समावेश
वार्ताहर/ सांबरा
सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींच्या तिसऱ्या तुकडीतील जवानांचा दीक्षांत समारंभ शनिवारी पार पडला. यामध्ये 22 आठवड्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या 2,614 अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींचा (पुरुष आणि महिला) समावेश होता.
प्रारंभी प्रशिक्षणार्थींनी प्रभावी पथसंचलन केले. प्रमुख पाहुणे म्हणून एअर व्हाईस मार्शल आर. रविशंकर (एअर ऑफिसर कमांडिंग, अॅडव्हान्स हेडक्वॉर्टर, दक्षिण-पश्चिम एअर कमांड) यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी बोलताना त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून आपल्या कर्तव्यासाठी कटिबद्ध रहा, असे आवाहन केले. यावेळी अग्निवीर प्रशिक्षणासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पालकांचेही त्यांनी अभिनंदन केले.
याच वेळी विवेकसिंग रावत याला बेस्ट इन अकॅडमिक्स, नितेश याला बेस्ट इन ग्राऊंड सर्व्हिस ट्रेनिंग तर विवेकसिंग रावत याला बेस्ट ऑलराऊंडर ट्रॉफीने गौरविण्यात आले.









