बीएसएफचा सरकारला प्रस्ताव : पाकिस्तानला धडा शिकविणाऱ्या महिला जवानांचे कौतुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सांबा सेक्टरच्या पोस्टरला ‘सिंदूर’ नाव देण्यात यावे असा प्रस्ताव बीएसएफने मांडला आहे. याचबरोबर पाकिस्तानच्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या दोन जवानांच्या नावावर अन्य दोन पोस्टचे नामकरण केले जावे असे बीएसएफने म्हटले आहे. जम्मू फ्रंटियरच्या बीएसएफचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.
10 मे रोजी सकाळी पाकिस्तानच्या ड्रोनने आमच्या पोस्टवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, यानंतर बीएसएफ जवानांनी त्वरित त्याचा सामना केला, यादरम्यान एक उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज आणि कॉन्स्टेबल दीपक कुमार हुतात्मा झाले. सैन्याच्या नायक सुनील कुमारसोबत मिळून दोघेही ड्रोन पाडविण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ड्रोनमधून बॉम्ब फेकण्यात आल्याने तिघेही हुतात्मा झाले होते असे शशांक आनंद यांनी सांगितले.
हुतात्मा जवानांचे नाव दोन पोस्टना देण्यात यावे अशी आमची इच्छा आहे. तर सांबा सेक्टरमधील एका पोस्टरला सिंदूर नाव देण्यात यावे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान महिला जवान देखील सेवेवर तैनात होत्या. असिस्टंट कमांडेंट नेहा भंडारी, कॉन्सटेबल मंजीत कौर, कॉन्स्टेबल मलकीत कौर, कॉन्स्टेबल ज्योति, कॉन्स्टेबल संपा आणि कॉन्स्टेबल स्वप्ना आणि अन्य महिला जवानांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठे योगदान दिल्याचे बीएसएफ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पाकिस्तानातून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रs आणि ड्रोन्सला आकाशातच नष्ट करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने फलौदी वायुतळासह राजस्थानच्या संवेदनशील स्थानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सैन्याने अचूकवेळी आणि गरजेनुसार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने बाडमेर, जैसलमेर, बिकानेर आणि श्रीगंगानगर जिल्ह्यांमध्ये 413 ड्रोन हल्ल केले, परंतु हे हल्ले भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने आकाशातच उधळून लावल्याची माहिती बीएसएफचे महानिरीक्षक (राजस्थान फ्रंटियर) एम.एल. गर्ग यांनी दिली आहे.
सतर्क राहण्याची गरज
पाकिस्तानी दहशतवादी स्वत:च्या लाँडपॅड्स आणि शिबिरांमध्ये परतत असल्याचे इनपूट आम्हाला मिळत आहेत. अशास्थितीत हे दहशतवादी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात. बीएसएफ घुसखोरी रोखण्यासाठी सदैव सज्ज असल्याचे शशांक आनंद यांनी सांगितले आहे. आम्ही सीमेवर सातत्याने देखरेख ठेवत आहोत. सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना स्वत:चे पीक कापण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. आमचे शेतकरी सुरक्षेदरम्यान स्वत:च्या कृषी कार्यांना पूर्ण करत आहेत. बीएसएफचे जवान सीमावर्ती गावांचा दौरा करत बैठका, वैद्यकीय शिबिरं आणि अन्य कार्यक्रम आयोजित करत असल्याचे त्यांनी सांगितले.









