कागल,प्रतिनिधी
Samarjitsinh Ghatge News : राज्यातील राजकीय महानाट्यानंतर गेली दोन दिवस नॉटरिचेबल असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे हे आपली भूमिका कार्यकर्त्यांशी चर्चा करून गुरुवार दिनांक ६ रोजी कागल येथे मांडणार आहेत.त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून समरजीतसिंह घाटगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत रविवारी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.या राजकीय परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते व कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि रविवारी आमदार मुश्रीफ यांनी शिंदे -फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.यामुळे मतदारसंघातील भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची फार मोठी कोंडी झाली आहे.
या राजकीय भूकंपानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते.मंगळवारी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे घाटगे यांनी भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. यानंतर बुधवारी घाटगे यांनी सोशल मीडियाद्वारे आपण गुरुवारी सकाळी दहा वाजता कागल येथे येणार असून गैबी चौकातील ज्युनियरकर वाडा येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून समरजीतसिंह घाटगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








