समरजितसिंह घाटगे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जावू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे घाटगे यांची भेट घेणार आहे. घाटगे यांनी घाईत हा निर्णय घेऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले,समरजितसिंह घाटगे हे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत. राज्यात महायुतीचे समीकरण झाले. त्यामुळे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर आला. समरजितसिंह घाटगे यांनी गेली काही वर्षे विधानपरिषदेसाठी कष्ट केले आहे. त्यामध्ये त्यांना अडचण निर्माण झाली आहे. म्हणून त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा. ही माहिती कळाल्यावर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी पक्षात राहावे यासाठी भेटून घेऊन विनंती करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे घाटगे यांच्याशी चर्चा करुन इतक्या लवकर निर्णय घेऊ नये अशी विनंती करणार आहे.काही दिवस थांबून निर्णय घ्यावा.
भाजपचे राहुल देसाई यांनीही राजीनामा दिला आहे.देसाई यांच्या राजीनाम्यावर बोलताना खासदार महाडिक म्हणाले, पक्षाच्या प्रदेश पातळीवर संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय झाला आहे. त्याप्रमाणे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाथाजी पाटील यांची भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राहुल देसाई यांनी नाराजीतून राजीनामा दिला नाही. देसाई यांना उच्च पदे दिले जाईल. त्यांना वेगळया जबाबदार देण्यात येणार आहेत असे महाडिक यांनी सांगितले