समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्येच राहण्याचा निर्धार; कागलमध्ये समरजितसिंह घाटगे कार्यकर्ता मेळावा
कागल / प्रतिनिधी
जे झाले ते एकदम करेक्ट झाले. माझ्या निशब्द राहण्याची राज्यभर चर्चा झाली, कागलच्या परिवर्तनाकडे राज्याचे लक्ष आहे हे यातून दिसून येते. कागलमध्ये स्वराज्याचा भगवा फडकवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कमळ कागलमध्ये फुलवायचे आहे. माझ्या विजयाचे आज भूमिपूजन झाले. 2024 मध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी मी विजय होणार हे आता निश्चित झाले आहे. असा विश्वास व्यक्त करत आपण भाजपाचेचे असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.
येथील ज्युनिअर वाड्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला. व्यासपीठावर सौ. नवोदिता घाटगे, श्रेयादेवी घाटगे, विरेंद्रसिंह घाटगे, अखिलेशराजे घाटगे, संग्रामसिंह कुपेकर, बाबासाहेब पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात सर्वच व्यक्तींनी, येत्या 2024 ला समरजितसिंह घाटगे आमदार असतील असे सांगितले.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, मी गेले दोन-तीन दिवस नॉटरिचेबल होतो. पण मुंबईत नव्हतो कोल्हापुरातच होतो. मी पण माणूस आहे, मशीन नाही. सत्ता आली पण आमची कामे होत नव्हती. मी निशब्द झालो होतो. अशा अवस्थेत कार्यकर्त्यांनी मला पहावे असे मला वाटत नव्हते. म्हणून मी नॉटरिचेबल होतो. राजकारणात खोटे बोलायला अजून मी शिकलो नाही. अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, ते मी कट केले. मला त्या दिवशी चंद्रकांतदादा पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोन आले. देवेंद्र फडणवीस यांचा ‘मुंबईत असाल तर भेटायला या‘ असा मेसेज आला होता. मी त्यानंतर मुंबईत त्यांना भेटायला गेलो. मी काही मागायला गेलो नव्हतो, मला जे मनातलं बोलायचं होतं, ते बोलायला गेलो होतो. मी ते हक्काने बोललो. माझा आत्मविश्वास वाढला. या काळात लोकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल आयुष्यभर त्यांचा ऋणी आहे.
ते म्हणाले, माझ्याविषयी अनेक चर्चा झाल्या. थोडा आणखीन उशिरा लोकांना भेटलो असतो तर माझा काँग्रेस प्रवेशदेखील करून टाकला असता. राज्यभरात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी फोन केले. ते कोणी करायला सांगितले हे मला चांगले माहिती आहे. मला घालवायची एवढी घाई का?
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांच्या निर्णयामुळे त्यांचे अनेक कार्यकर्ते आमच्या प्रचारात आणल्याबद्दल धन्यवाद. येणारी विधानसभा मी डबल मताधिक्याने जिंकणार आहे. आता लवकरच बूथ दौरा सुरू करणार आहे. शाहूंच्या या जन्मभूमीला कर्मभूमी करायचे आहे. त्यासाठी संधी द्या. 2024 च्या निवडणुकीसाठी आजचा मेळावा हा विजयाची पायाभरणी म्हणून घोषित करतो. आपली साथ कधीच सोडणार नाही. आपला विजय आणखी मोठा झाला आहे. परिवर्तन झाले आहे हे लक्षात ठेवा. रेकॉर्डब्रेक मतांनी कागलचा कोंडाणा परत घ्यायचा आहे. आमदार होईपर्यंत कोणी झोपायचे नाही, कोणाला झोपू द्यायचे नाही. असे ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र तारळे (गडहिंग्लज), शकिला शानेदिवान (बाचणी), अनिता चौगुले (गडहिंग्लज), शर्मिष्ठा कागलकर, रमेश माळी आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक भैय्या इंगळे यांनी केले. आभार संजय पाटील यांनी मानले.
मेळाव्यास एम. पी. पाटील, अमरसिंह घोरपडे, सुनिल मगदूम, सचिन मगदूम, प्रकाश पाटील, संजय धुरे, बॉबी माने, युवराज पसारे, दीपक मगर, संदीप नेर्ले, राजेंद्र जाधव, नंदकुमार माळकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी गुरु बदलणार नाही …
मी पक्षाचा अधिकृत कार्यकर्ता असताना दुस्रयासाठी मी पार्टी सोडायची काय? असे सांगून ते म्हणाले, पहिल्यांदा राष्ट्र, त्यानंतर पार्टी आणि शेवटी व्यक्ती. स्व. विक्रमसिंहराजे यांचे गुरु वसंतदादा पाटील व यशवंतराव मोहिते होते. माझे राजकीय गुरु चंद्रकांतदादा पाटील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राष्ट्र आणि राज्यासाठी पक्षाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. माझा गुरु मुख्यमंत्री असताना पक्षासाठी उपमुख्यमंत्री होऊ शकतो. पक्षाची अडचण असताना जो आदेश दिला जातो तो मान्य करावा लागतो. अनेकांनी गुरु बदलले पण माझी गुरु बदलण्याची पद्धत नाही. रक्ताचा शेवटचा थेंबापर्यंत गुरूला सोडणार नाही. तसे माझ्यावर संस्कारच आहेत.
छञपती शाहूंची जन्मभूमी कर्मभूमी बनवुया…
कागल ही छञपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आहे. कार्यकर्तुत्वाच्या जोरावर आपण या भुमीला कर्मभूमी बनवुया. होतय ते भल्यासाठीच कारण आपल्या प्रचाराला आता पुरोगामीचे नेतेही सहभागी होणार आहेत.









