भाजपच्या मेहरबानीमुळेच हसन मुश्रीफ याना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असून त्यांनी भाजपच्या चौकटीत राहूनच काम करावे अशा पद्धतीचा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला आहे. तसेच हनस मुश्रीफ यांनी सत्ता आणि पदासाठीच आपले राजकिय गुरु बदलले असल्याचा टोलाही लगावला. त्यामुळे ऱाष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यातील सत्तासहभागानंतरही मुश्रीफ आणि घाटगे यांचा संघर्ष अटळ असल्याचा इशाराच जणू त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यातील सुधारित पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. अनेक मोठे बदल करताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे दिले. त्यामुळे अनेक वर्षांच्या राजकिय प्रवासामधील हसन मुश्रीफांची या पालकमंत्रीपदाने इच्छापुर्ती झाली आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफांच्य़ा या राजकिय यशाकडे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे काय मत व्यक्त करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज माध्यमांशी संवाद साधताना समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांचे अभिनंदन करून एक प्रकारचा इशाराही दिला आहे. ते म्हणाले, “नविन पालकमंत्र्यांचे अभिनंदन….याअगोदर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्या,ह भाजपच्या सर्व नेत्यांवर टिका केली. पण आज भाजपच्याच मेहरबानीमुळे त्यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या चौकटीमध्य़े राहूनच काम करावं. त्यांनी भाजपची चौकट ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर माझा त्यांना काय विरोध असणार आहे.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी संघर्ष अटळ असल्याचे म्हटले आहे. ते मुख्यमंत्री जरी झाले तरी मला फरक पडत नाही पालकमंत्री सोडून द्या. कागलचे स्वराज्य होणे अटळ आहे. जितना बडा संघ्रर्ष…उतनी बडी जीत होगी….! माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे पद नाही तरी पण लोकांचा अशिर्वाद हेच माझ्यासाठी मोठे पद आहे. पण काहींनी सत्ता आणि पदासाठी आपले गुरुच बदलले आहेत हेच त्यांचा आणि माझ्यातील फरक आहे.” असा टोला त्यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला.









