लवकरच सुरू होणार चित्रपट
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यापूर्वी ‘शांकुतलम’ या चित्रपटात दिसून आली होती. याचबरोबर ती ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. याचे दिग्दर्शन राज आणि डीके करत असून निर्मिती रुसो ब्रदर्स यांच्याकडून होत आहे. अभिनेत्री आता याचदरम्यान स्वत:च्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे.

या चित्रपटाचे नाव ‘चेन्नई स्टोरी’ असून तो इंग्रजी चित्रपट आहे. तमिळ भाषेत देखील हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. फिलिप जॉन यांच्याकडून दिग्दर्शित हा आगामी इंग्रजी रोम-कॉम असून यात समांथा अन् विवेक कालरा प्रमुख्य भूमिकेत आहेत. ‘चेन्नई स्टोरी’ हा चित्रपट स्वत:च्या आईच्या निधनानंतर चेन्नईचा प्रवास करणाऱ्या युवकाची कहाणी दर्शविणार आहे. हा युवक स्वत:च्या वडिलांचा शोध घेण्यासाठी महिला हेराची मदत घेत असतो.
हा चित्रपट एन. मुरारी यांची कादंबरी ‘अरेंजमेंट ऑफ लव्ह’वर आधारित असल्याचे समजते. अभिनेत्री समांथा लवकरच ‘कुशी’ चित्रपटात विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. शांकुतलम पूर्वी समांथा यशोदा चित्रपटात दिसून आली होती.









