मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने मातब्बर समाजवादी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. बिगरकाँग्रेसवाद या राम मनोहर लोहिया यांच्या विचारातून पुढे आलेल्या या नेत्याने आपल्या आयुष्यात सोशल इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना दाखवून दिला. कांशीराम यांच्या साथीने उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून दिग्गज काँग्रेसला हद्दपार करण्याची किमया करून दाखवली. पण, बिगरकाँग्रेसवाद म्हणजे केवळ काँग्रेसला विरोध असे गुरुच्या विचाराचे अंधानुकरण त्यांनी कधीच केले नाही. त्यामुळे जॉर्ज फर्नांडिस व इतर नेत्यांहून ते निराळे दिसले. प्रदीर्घ काळ लोकनेते बनून राहिले. राजकारण संपले असे जेव्हा भासले तेव्हा तेव्हा उसळून जिंकले. भाजपच्या उन्मादी राजकारणाला छेद देण्यासाठी आघाडय़ांच्या राजकारणाचे नेतृत्व केले. लेचेपेचे न राहता काँग्रेस आणि भाजप दोन्हीला प्रादेशिक पक्षांची शक्ती दाखवून राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान बनवले. प्रसंगी त्यांनी गुरु आणि नेत्यांनाही आघाडय़ांचे हुकूमशहा बनू दिले नाही. स्वतःच्या हिमतीवर राजकारण करायचे आणि आपल्या अटी, शर्तीवर ते निभावून दाखवायचे कसब या मल्लाने आत्मसात केले होते. यादव म्हणजे आपसात भांडणारे, शेतीत राबून, भाऊबंदकीत संपणारे आणि गुरा-ढोरांमागे धावणारे पैलवान या प्रतिमेला बदलले. ओबीसी राजकारणातील सशक्त शक्ती असे यादवांचे चरित्र पलटवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यामुळेच यादवांना ओबीसीतून बाहेर काढण्याचे मनसुबे उधळले आणि ओबीसी शक्तीचे खच्चीकरण टळले. त्यांच्या आयुष्याची सुरुवात एक शाळा मास्तर म्हणून झाली. जी खडतर होती. सायकलने वीस किलोमीटरचा प्रवास करून ती सायकल एका उंच झाडाला टांगायची, जेवणाची आणि एक जोड कपडय़ाची पिशवी घेऊन पोहत नदीपलीकडच्या शाळेत शिकवायला जायचे. वाळलेले कपडे अंगावर चढवून अध्यापन करायचे आणि शाळा सुटल्यावर पुन्हा तसाच उलटा प्रवास करून घर गाठायचे, अशा अवस्थेत वयाच्या 28 व्या वषी पहिल्यांदा आमदार झाले! कुस्ती स्पर्धेत नत्थूसिंग या आपल्या गुरुलाच पराभूत करणाऱया मुलायम सिंह यांनी विधानसभेलाही त्यांनाच पराभूत केले. लोहियांच्या निधनानंतर चौधरी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कृषक दलात त्यांनी काम केले. कृषक दल आणि संयुक्त समाजवादी पक्ष विलीनीकरणातून बनलेल्या लोक दलाचे ते 74 ला आमदार झाले. आणीबाणीत जेलमधून बाहेर येताच जनता पार्टीचे सहकार मंत्री म्हणून उत्तर प्रदेशात त्यांनी कामगिरी केली. ग्रामीण भागातील सहकारी चळवळीवर वर्चस्व निर्माण केले. त्यातून शेतकऱयांचा नेता ही प्रतिमा निर्माण केली. चरणसिंहांच्या लोक दलाचे राजकारण पुढे नेत ते 89 साली जनता दलाचे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. आठ वेळा आमदार, सातवेळा खासदार, तीनदा सर्वात मोठय़ा राज्याचे मुख्यमंत्री ही त्यांची मोठीच मजल. व्ही.पी. सिंह यांच्या काळात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा त्यांना प्रचंड लाभ झाला. याच दरम्यान झालेल्या मंदिर-मशिद वादातून करसेवकांवर गोळीबार केल्याने मुल्ला मुलायम अशी बदनामीही कायमची पदरी पडली. पण उन्मादी राजकारणाने देशाचे वाटोळे होईल, पाकिस्तान या देशातील मुस्लिमांना फितवून भारताच्या विरोधात अंतर्गत युद्ध छेडेल, ते होऊ नये म्हणून आपण गोळीबाराचा निर्णय घेतला असे त्यांनी समर्थन केले. आयुष्यभर त्यांचा धिक्कार झाला. पण ते भूमिकेवर ठाम राहिले. भाजपला रोखणारे म्हणून मुलायम आणि लालूप्रसाद यादव त्यामुळेच देशभर ओळख बनवू शकले. पुढे राष्ट्रीय राजकारणातही स्थिरावले. 1990 मध्ये जनता दल फुटला आणि चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांनी समाजवादी जनता पार्टी स्थापन केली. स्वतःच्या भावाला राज्यसभेत खासदार बनवून त्यांनी चंद्रशेखर यांनाही धक्का दिला. चरणसिंह पुत्र अजितसिंह यांना मुख्यमंत्री करण्याचे चंद्रशेखरांचे मनसुबे त्यांनी हाणून पाडले. 1992 मध्ये समाजवादी पक्ष हा आपला स्वतःचा पक्ष स्थापन करून सायकल हे त्याचे चिन्ह बनवले. ही सायकल उत्तर प्रदेशातील सर्वसामान्यांच्या जगण्याचे प्रतीक बनली. याच दरम्यान 1993 साली दलित, ओबीसी, यादव, मुस्लिम असे सोशल इंजिनिअरिंगद्वारे कांशीराम यांच्याबरोबर अभूतपूर्व युती घडवून त्यांनी भारतीय राजकारण्यांचे डोळे दीपवले. 1996 मध्ये एच.डी. देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षण मंत्री होते. तोपर्यंत शहीद सैनिकांचे फक्त गणवेशच त्यांच्या घरी पोहोचवण्याची लष्करात प्रथा होती. मात्र मुलायम सिंह यांनीच ब्रिटीश कालीन निर्णय बदलून शहिदाचा मृतदेह सन्मानपूर्वक त्याच्या जन्म गावी पोहोचवून इतमामात अंत्यसंस्काराचा स्तुत्य उपक्रम सुरू केला. 2003 साली भाजपचे सरकार उत्तर प्रदेशात गडगडले तेव्हा ते काँग्रेस व कल्याणसिंह यांना हाताशी धरून सत्तेवर आले. 2012ला लाटेवर स्वार होत त्यांनी सत्ता हस्तगत केली आणि पुत्र अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री बनवले. नोटबंदी करण्यामागे यादवांचे प्रदेशातील वर्चस्व कमी करणे हेही एक कारण होते. 2017 सालच्या विधानसभेला त्याचा प्रत्यय आला. पुढे समाजवादी पक्षात फूट पडण्याची वेळ आली तेव्हा मुलायमसिंह यांनी कठोरपणे स्वतःच्या भाऊ आणि पुत्रावरही निलंबनाची कारवाई केली. पुढे त्यांच्याशी जुळवूनही घेतले. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र 2019 मध्ये परिस्थिती बदलत नाही हे पाहून त्यांनी लोकसभेत मोदी यांना ते पुन्हा पंतप्रधान होतील अशा उमद्या शुभेच्छाही दिल्या. 1999 मध्ये सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यास पाठिंब्याचे पत्र न देण्याचा ठामपणा त्यांनी दाखवला. मात्र अणु करारावरून डाव्या पक्षाने पाठिंबा काढून घेतला असताना त्यांच्या विरोधाला झुगारून आणि टीकेची पर्वा न करता मनमोहन सिंग यांना पाठिंबा देण्याचे धाडसही दाखवले. स्वतःच्या विचाराने राजकारण करण्याची आणि त्याचे परिणाम भोगायचीही तयारी हा मुलायम सिंह यांचा निडरपणा नेहमीच दिसून आला. परिस्थितीला शरण न जाता स्वतःचे राजकारण घडवण्याची किमया ज्यांना प्राप्त होते त्यांनाच ‘नेताजी’ ही पदवी शोभून दिसते. मुलायमसिंह यादव ‘नेताजी’ बनले ते त्यांच्या या गुणांमुळेच!
Previous Articleमुलायमसिंह यादव यांचे निधन
Next Article पावसाचा लांबला मुक्काम… शेतकऱयांना फुटला घाम!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








